Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Khadkeswar Bal Dnyan Mandir School Wall Collapse

तासभर पाऊस;भिंत कोसळली, 350 विद्यार्थी बचावले

प्रतिनिधी | Jun 19, 2013, 08:37 AM IST

  • तासभर पाऊस;भिंत कोसळली, 350 विद्यार्थी बचावले

औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंतीची डागडुजी न केल्याने मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता खडकेश्वर येथील बालज्ञान मंदिराची 10 फूट उंचीची भिंत कोसळली. ही घटना घडण्याच्या तासभर आधीच दुसर्‍या शिफ्टची शाळा सुटल्याने 350 विद्यार्थी बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.

बालज्ञान मंदिर शाळेचे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग खडकेश्वर येथील संत एकनाथ संशोधन मंदिराच्या जुन्या इमारतीत भरतात. सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग (पहिली शिफ्ट) सकाळी 7.10 ते 12.30 या वेळेत व पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग (दुसरी शिफ्ट) दुपारी 12.40 ते सायंकाळी 5.30 दरम्यान भरतात. दुपारच्या पाळीत सुमारे 350 विद्यार्थी शिकतात. विद्यार्थी दररोज दुपारी 2.30 ते 2.45 च्या सुमारास संरक्षक भिंतीच्या बाजूलाच डबा खाण्यासाठी बसतात. सायंकाळी 5.30 वाजता शाळा सुटल्याने सर्व विद्यार्थी घरी परतले होते.

इमारतीजवळ साचते गुडघाभर पाणी
1964 पासून या ठिकाणी शाळा असून 25 वर्षांपूर्वी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले. शाळेची इमारत जुनी आहे. तसेच येथे कायम गुडघाभर पाणी साचत असल्याने संरक्षक भिंतीचा पाया कमकुवत झाला आहे. वेळेवर डागडुजी केली असती तर ही भिंत कोसळली नसती.

रस्त्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार
इमारतीच्या परिसरात पावसाळ्यामध्ये दरवर्षी गुडघ्यापर्यंत पाणी साचते. त्यामुळे संरक्षक भिंत पडण्याच्या अवस्थेत आली होती. रस्त्याचे सपाटीकरण करण्यात यावे, यासाठी शाळा प्रशासनाने मनपाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

दुरुस्तीचे काम सुरू केले होते
रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. हे मनपाच्या निदर्शनास आणून दिले. इमारत संत एकनाथ संशोधन मंदिराची असून त्यांच्याकडेही मागील वर्षीच इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव दिला, परंतु दुरुस्ती झाली नाही. भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते. रमाकांत मुळे, मुख्याध्यापक, बालज्ञान मंदिर

शहरात तासभर पाऊस

शहरात मंगळवारी रिमझिम पाऊस बरसला. दुपारी चारच्या सुमारास जवळपास वीस मिनिटे संततधार पाऊस सुरू होता. सिडको-हडको भागात पावसाचा जोर अधिक जाणवला. औरंगपुरा, शहागंज आणि गारखेड्यात रस्त्यावर पाणी साचल्याने अनेकांची तारांबळ उडाली. दिवसभरात 9.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा होती. परंतु खंडित पाऊस झाल्याने अनेकांची निराशा झाली. आभाळात दुपारी ढगांनी दाटी केली होती. त्यामुळे घराबाहेर पडताना शहरवासीयांनी रेनकोट, छत्र्या सोबत ठेवल्या. परंतु अचानक ऊन पडल्याने अनेक जण अचंबित झाले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 9.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेच्या वतीने देण्यात आली. रात्री सातच्या सुमारासही पंधरा मिनिटे हलक्या सरी कोसळल्या. क्रांती चौक परिसरात खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. वीजपुरवठा सर्वत्र सुरळीत होता. जीटीएलकडे एकही तक्रार आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Next Article

Recommended