आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khaire And Janjal Debate Front Of Mumbai Deputy Leader

मुंबईच्या उपनेत्यासमोर होणार खैरे-जंजाळ वादाची सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा देवळाई या दोन वाॅर्डांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर बुधवारी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्वपक्षाच्या कनिष्ठ कार्यकर्त्यांवर बेछूट आरोप करत त्यांना नेत्यांच्या ठिकाणी आणून ठेवले. यातून सेनेतील अंतर्गत कलह वाढला. कोणी चूक केली अन् कोण बरोबर आहे, हे श्रेष्ठींकडे म्हणजेच "मातोश्री'वर सांगण्यासाठी सर्वच गटांनी वृत्तपत्रांच्या बातम्यांची मदत घेतली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार "मातोश्री'वर औरंगाबादेतील बातम्यांचा खच पडला आहे. या आरोप-प्रत्यारोपांत नेमके कोणाचे चुकले, याचा आढावा मुंबईतील एक उपनेता घेणार असल्याचे समजते.
सोमवारी दोन वाॅर्डांचा निकाल जाहीर झाला. यात सेनेचे पाणीपत झाले. तेव्हापासूनच सर्वांनीच सेनेच्या स्थानिक नेत्यांना धारेवर धरले. कारण केवळ अंतर्गत कलहामुळे सेनेचा पराभव झाल्याचे सेनेच्या नेत्यांनाही माहिती आहे. स्वत:चा मतदारसंघ असतानाही खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री रामदास कदम यांनी विश्वासात घेतले नाही, म्हणून आमदार संजय शिरसाट यांनी बुधवारी मातोश्री गाठली. शिरसाट हे मातोश्रीवर जाणार असल्याची कल्पना खैरे यांना होती. त्यामुळेच त्यांनी बुधवारी दुपारी अनपेक्षितपणे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ तसेच भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यावर बेछूट आरोप केले. त्याला जंजाळ तसेच राठोड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जंजाळ तर थेट खैरेंच्या घरीच दाखल झाले होते.
आपण आरोप करून चुकलो, याची जाणीव खैरे यांना उशिरा झाली आणि शुक्रवारपासून तेही बचावाच्या कामाला लागले. जंजाळ यांनी केलेली कृती कशी चुकीची होती, हे दाखवण्यासाठी त्यांनीही वृत्तपत्रांच्या बातमीचा आधार घेतला. दुसरीकडे जंजाळ यांनीही तेच केले आणि दानवे यांनी त्यांच्या पद्धतीने बातम्यांची कात्रणे तसेच स्वत:चे निवेदन सादर केले. तिकडे पालकमंत्री कदम यांनीही स्थानिक पदाधिकाऱ्याला सांगून येथील बातम्यांचे ‘तुकडे’ मागून घेतले अन् ते "मातोश्री'वर पोहोचते केल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘मातोश्री’ या निवासस्थानी सध्या औरंगाबादेतील बातम्यांच्या कात्रणांचा खच पडला आहे. मात्र यावर तूर्तास कोणतीही प्रतिक्रिया देता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे संकेत "मातोश्री'वरून देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई कोणावर करायची हा प्रश्न आहे. खैरे हे उपनेते आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न नाही. खैरे यांनी केलेल्या आरोपानुसार दानवे जंजाळ जर पराभवाला जबाबदार असतील तर तसे स्पष्ट होत नाही. कारण पालकमंत्री कदम तसेच खैरे यांनीही प्रचारात सभा घेतल्या होत्या तसेच उमेदवारांना रसदही पुरवली होती. त्यामुळे केवळ दोघेच या पराभवाला जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही.

स्वत:च्या मतदारसंघातच शिरसाट यांना कोणी बेदखल केले, हे स्पष्ट होत नाही. शिरसाट यांनी तेव्हाच तक्रार का केली नाही, अशीही विचारणा झाल्याचे समजते. नेमके त्याच वेळी बहुतांश पदाधिकारी हे सामूहिक विवाह सोहळ्यात व्यग्र होते. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे श्रेष्ठींचे म्हणणे आहे. त्यामुळे तूर्तास वक्तव्य करू नका, नंतर बघू, असे नेत्यांनी सांगितल्याचे समजते.

पुढील महिन्यात उद्धव ठाकरे शहरात
दरम्यान, औरंगाबादेत नेमके काय झाले, पराभव कशामुळे झाला, त्यानंतरच्या आरोप-प्रत्यारोपांत नेमके कोणाचे चुकले, याचा आढावा मुंबईतील एक उपनेता घेणार असल्याचे समजते. त्या नेत्याचा अहवाल तपासल्यानंतरच उद्धव ठाकरे यावर भाष्य करतील. मे महिन्यात ठाकरे औरंगाबादेत येणार आहेत. तेव्हा नेमके काय झाले होते, याचे उत्तर द्यावे लागेल, याची माहिती असल्याने आतापासून पक्षाने ही तयारी केल्याचे समजते.