आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खैरे-बारवाल यांच्यात फोनवरून खडाजंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मी आदेश दिले असताना जिल्हाप्रमुखांना फोन का केला, यावरून भडकलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजी महापौर आणि गटनेते गजानन बारवाल यांना अद्वातद्वा भाषेत जाब विचारल्याने या दोघांत बुधवारी खडाजंगी झाली. वेळ आली तर राजीनामा देईन, पण सहन करणार नाही, असे सांगत मनपात नाक खुपसू नका, असे बारवाल यांनी खैरे यांना सुनावले. सखाराम पानझडे यांच्या शहर अभियंतापदावरील नियुक्तीवरून हा सारा झगडा झाला.

शिवसेनेचे उपनेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचा महानगरपालिकेच्या कारभारातील हस्तक्षेप जगजाहीर आहे. यासंदर्भात नगरसेवकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली असली तरी खैरे यांचा हस्तक्षेप सुरूच असतो. बुधवारी यावरूनच मनपातील गटनेते गजानन बारवाल आणि खैरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे भांडण एवढे टोकाला गेले की, बारवाल यांनी चक्क राजीनाम्याचा इशाराही दिला.


दानवेंना का सांगितले?
गटनेते बारवाल यांना सकाळी खासदार खैरे यांनी फोन करून पानझडेंच्या नियुक्तीचा प्रस्ताव आणायचा आणि तो मंजूर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. शिवसेनेच्या पद्धतीनुसार जिल्हाप्रमुख धोरणात्मक निर्णय कळवतात व त्यानुसार त्याची अंमलबजावणी होईल याची जबाबदारी सांभाळतात. त्यानुसार बारवाल यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना कशी फील्डिंग लागली याची माहिती दिली. हे खासदार चंद्रकांत खैरे यांना समजले. खैरे आणि दानवे यांच्यात वितुष्ट असल्याने व्हायचे तेच झाले आणि खासदार खैरे संतापले. संतापातच ते बारवाल यांच्यावर बरसले.

सर्वपक्षीय पानझडेंच्या पाठी
बुधवारी मनपाची नियमित सर्वसाधारण सभा होती. आचारसंहितेच्या काळात प्रस्ताव घेता येतात का याची माहिती घेऊन सखाराम पानझडे यांच्या शहर अभियंता पदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून मांडण्याची रणनीती ठरली. त्यानुसार केवळ सत्ताधारीच नव्हे, तर विरोधकांनाही या प्रस्तावाचा मार्ग सुकर करण्यात सहभागी करून घेण्यात आले. सभागृहात राजू वैद्य यांनी हा प्रस्ताव मांडला. त्यावर सर्मथनार्थ राजू शिंदे, अफसर खान, विरोधी पक्षनेते यांनी भाषणे केली आणि सभागृहाने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला. आता सभागृहाचा हा निर्णय शासनाकडे पाठवण्यात येणार असून मंजुरी मिळाल्यावर पानझडेंची शहर अभियंता पदावर प्रतिष्ठापना होणार आहे.


काय झाले भांडण?
खासदार खैरे : पानझडेंच्या बाबतीत मी सांगितले असताना तुम्ही दानवेंना का फोन केला ? जिल्हाप्रमुख मोठा की मी उपनेता ? त्यांना फोन करायची गरजच काय ?
बारवाल : तुम्ही आमचे नेते आहात. तुमच्या सूचना आम्ही ऐकतो. त्यानुसारच सगळे झाले आहे. पण पक्षाच्या शिस्तीनुसार जिल्हाप्रमुखांना सांगणे काम आहे. तेच मी केले.
खैरे : तुम्ही स्वत:ला समजता काय? महापौरांना त्रास देता ? तुम्हाला मी गटनेता केले हे विसरले का ?
बारवाल : तुम्ही नाही. मला शिवसेनेने सगळी पदे दिली. महापौर केले. तुम्ही मदत केली असती तर आमदारही झालो असतो. गटनेतेपद काढून घ्या. तेच कशाला, नगरसेवकपदाचाही राजीनामा देतो. मला पदाची हाव नाही.


‘समांतर’साठीच पानझडेंच्या नियुक्तीची फील्डिंग
पानझडे यांच्याबाबतीत शिवसेना विशेषत: खासदार खैरे सॉफ्ट कॉर्नर बाळगून आहेत. खैरेंनी त्यांच्या समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी पानझडेंनाच पुढे केले आहे. आतासुद्धा खैरे यांनी टाइट फील्डिंग लावल्याचे सर्वांनाच माहीत आहे. बुधवारच्या सर्वसाधारण सभेत पानझडे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आणून तो मंजूर करून घेण्याचा निर्णय झाला. खैरे यांनी तशी फील्डिंग लावली.