आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khaire Minister Will, I Just Unlucky MP Raosaheb Danve

खैरे मंत्री होतीलच, मी मात्र दुर्दैवी - खासदार रावसाहेब दानवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-1990 पासून राजकारणात सोबत असणारे खासदार चंद्रकांत खैरे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. पण मी अत्यंत दुर्दैवी माणूस आहे, असे सांगत राजकारणात आपल्याला मंत्रिपद न मिळाल्याची खंत जालन्याचे खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज प्रथमच जाहीरपणे बोलून दाखवली.
खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात दानवे यांनी दणकेबाज भाषण केले. हास्यविनोदाच्या माध्यमातूनच त्यांनी आपल्याला मंत्रिपद व प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्याची खंत जाहीरपणे बोलून दाखवली. या कार्यक्रमात प्रत्येक वक्ता खैरे यांनी मंत्री व्हावे असे सांगत असतानाच त्यांना दानवे यांचा विरोध नसेल हे काही जणांनी बोलूनही दाखवले. त्याचा उल्लेख करीत दानवे यांनी आपले मन अखेर मोकळे केले. खैरे हे कसे ऊर्जा असलेले नेते आहेत हे सांगताना त्यांनी आपण त्यांच्यासोबत 1990 पासून आहोत हे निदर्शनास आणले. ते म्हणाले की, खैरे याही वेळी नक्की निवडून येतील आणि ते मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. मी त्यांना चांगला ओळखतो. पण मी मात्र दुर्दैवी माणूस आहे. विधानसभेत होतो, आता लोकसभेत आहे. पण तुम्ही मात्र दोन्ही बाजूंनी गळ टाकला आहे.यंदा प्रदेशाध्यक्ष पदासाठी दानवेंच्या नावाची जोरदार चर्चा होत असतानाही त्यांना संधी नाकारण्यात आली, याची रुखरुख त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केल्याचे उपस्थितांना चांगलेच जाणवले.
राजकीय कोपरखळ्यांच्या गजरात महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन
चंद्रकांत खैरे खासदार होणार हे त्यांचे प्रतिस्पर्धीसुद्धा मान्य करीत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडून येणे ही औपचारिकता बाकी आहे. ते लवकरच नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होतील, या शब्दांत मान्यवरांनी केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावात शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन झाले.
महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह अनिल भालेराव यांच्या हस्ते झाले. या वेळी ख्यातनाम उद्योजक राम भोगले, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, हर्षवर्धन जाधव, रिपाइंचे बाबूराव कदम, मिलिंद शेळके, राष्ट्रीय समाज पक्षाचे संतोष कोल्हे यांच्यासह शिवसेना, भाजप, रिपाइंच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराचा नारळ या कार्यक्रमातच फुटला.
राजकीय कोपरखळ्यांच्या माध्यमातून एकमेकांची विकेट घेण्याचा बहारदार कार्यक्रमही उपस्थितांना पाहायला मिळाला. आमदार संजय शिरसाट यांनी त्यांना औरंगाबाद पश्चिममधून मोठी आघाडी देऊ, असा शब्द दिला. आमदार जाधव यांनी दानवे साहेब माझे सासरे आहेत, तेव्हा त्यांचा तुम्हाला विरोध नसणारच, असे सांगत शुभेच्छांमध्ये भर टाकली. राम भोगले यांनी दानवे आणि खैरे या दोघांनीही मंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त करून उद्योगांबाबत निर्णय घेताना आम्हाला विचारात घेणारे सरकार आणा, अशा शुभेच्छा दिल्या. र्शीकांत जोशी म्हणाले की, दानवे यांना मंत्री करायचे की खैरे यांना हे मोदी ठरवतील; पण आम्हाला वाटते की, दोघांनीही मंत्री व्हावे.