आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरे-तनवाणींमध्ये बाचाबाची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समांतर जलवाहिनी योजनेवर कोसळलेले संकट दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, आमदार किशनचंद तनवाणी एकमेकांवर तुटून पडले. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या साक्षीने त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. प्रकरण अरे-तुरेपर्यंत पोहोचले. त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊ शकते, हे लक्षात येताच आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांनी हस्तक्षेप करून दोघांना शांत केले. सुभेदारी विर्शामगृहात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

2010 मध्ये खैरे यांनी केंद्राकडून 144 कोटींचा निधीही आणला, पण दोन वर्षांत योजनेचे काम सुरूच झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समांतरचा ठेका रद्द करण्याची घोषणा केली. विधान परिषदेत झालेल्या चर्चेत तनवाणीही सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना खैरे यांनी समांतरच्या विरोधात शिवसेनेचा एक आमदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून तनवाणींसह शिरसाट, जैस्वालही नाराज झाले. त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन समांतरचे स्वरूप बदला, अशी विनंती केली. दरम्यान, खैरे-तनवाणींमधील वादाची दखल घेऊन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घोसाळकर यांना पाठवले होते. त्यांच्या उपस्थितीत तनवाणी यांनी खैरेंनी आधी आरोपाविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. तेव्हा खैरे यांनी घूमजाव करत मी तुमच्याविषयी बोललोच नाही, असा पवित्रा घेतला.मात्र, विधानपरिषदेत माझ्याशिवाय औरंगाबादचा कोणता शिवसेनेचा आमदार होता, असा सवाल तनवाणी यांनी केला. त्यावर समांतरला विरोध करणार्‍यांना मी आडवा करून टाकेन, असे वक्तव्य खैरे यांनी केले. त्यावरून दोघांमध्ये ‘अरे, जारे, तु काय मला आडवा करतो.’ ‘खूप झाली मस्ती तुझी.’ ‘तुला मी बघून घेईन’ ‘काय बघायचं इथंच बघ’ अशी अरे-तुरे झाली. दोघांचाही तोल सुटल्याने ते हाणामारी करू शकतात, असे लक्षात येताच शिरसाट, जैस्वाल यांनी आवाज चढवत त्यांना शांत केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.


शांततापूर्ण चर्चा झाली
समांतर योजनेसह मनपाच्या विविध मुद्दय़ांवर अतिशय शांततापूर्ण चर्चा झाली. त्यात खैरे आणि तनवाणी यांनी एकमेकांना काही प्रश्न विचारले. त्यांच्यात कोणताही वाद झाला नाही. संजय शिरसाट, आमदार