आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खैरेंच्या माध्यमांना धमक्या ‘निवडणुकीनंतर बघून घेतो’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाया पडल्याचे छायाचित्र प्रकाशित झाल्याने संतापलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांची अद्यापही माध्यमांवर आगपाखड सुरूच असून औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी निवडणुकीनंतर बघून घेतो, योग्य वेळी योग्य उत्तर देतो, अशी धमकावणीची भाषा केली. त्यामुळे शिवसेनेतील पदाधिकारीही अस्वस्थ झाले असून निवडणुकीत हे महाग पडू शकते, अशी प्रतिक्रिया त्यांनी खासगीत दिली.

तिरुमला मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात खासदार चंद्रकांत खैरे गत निवडणुकीत पूर्व मतदारसंघातून पिछाडीवर राहिल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना यंदाच्या निवडणुकीत कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी माध्यमांनाच लक्ष्य केले. समोरच बसलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचा आणि छायाचित्रकारांचा नामोल्लेख करत त्यांनी त्यांच्यावरच हल्लाबोल केला.

खासदार खैरे म्हणाले की, पेपरवाले नेहमी विचारतात खासदारांनी काय केले म्हणून? मी काय दिल्लीत झोपा काढतो का? मी केलेल्या कामांची जंत्री वाचली तर पुस्तकच होईल. मी खूप काम केले आहे. तुम्ही कितीही खोट्या बातम्या दिल्या, तरी आमचे नेटवर्क जबरदस्त आहे. या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. खैरे यांच्या या विधानांमुळे व्यासपीठावर बसलेले शिवसेना नेते सुभाष देसाईदेखील अस्वस्थ झाले. पदाधिकार्‍यांतही चुळबूळ सुरू झाली. कार्यक्रमानंतर पदाधिकार्‍यांनी खासगीत बोलताना खासदार खैरे यांनी अशी भाषा वापरायला नको होती, असे सांगत याचा पक्षालाच निवडणुकीत फटका बसू शकेल, अशी भीती पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

योग्य वेळी उत्तर देईन
खासदार खैरे म्हणाले, आदित्यसाहेब ठाकरे युवा सेनेचे प्रमुख आहेत. त्यांच्या भाषणाला प्रसिद्धी देण्याऐवजी मी त्यांच्या पाया पडलो याचाच बाऊ केला गेला. ‘65 साल के सांसद ने 23 साल के युवा नेता के पैर पकडे’ असे दिवसभर चॅनलवर सुरू होते. त्यावर मी बोललो तर त्याची पण बातमी करण्यात आली. आता मी फार काही बोलणार नाही; पण योग्य वेळी योग्य उत्तर नक्की देईन. आदित्य ठाकरे यांच्या पाया पडतानाचा फोटो काढणारा फोटोग्राफरही येथे आहे. मी निवडणुकीनंतर त्याच्याकडे बघणार आहे, असे पत्रकारांचे नाव घेत सांगितले.