आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाम नदीला मिळाले जीवन, कायापालट दीड किमीचे पात्र स्वच्छ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज व्हेरॉक कंपनीच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून सुरू असणारे खाम नदीच्या पात्राच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला असून घाणीचे साम्राज्य नाहीसे होऊन नदी पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घेऊन खळाळू लागली आहे. सध्या फक्त दीड किलोमीटर पात्र स्वच्छ करण्यात आले आहे. हा दीड कोटीचा प्रकल्प असून यानंतर पूर्ण नदीचे स्वच्छता अभियान हाती घेतले जाणार आहे. बुधवारी या कामाची पाहणी करून विभागीय आयुक्त डाॅ. दांगट यांनी उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
...स्वप्न सत्यात उतरले
सहा महिन्यांपूर्वी सीआयआयने खाम नदीच्या पात्राचे सुशोभीकरण सुरू केले. छावणीतील पुलावरून शहरात येताना घाण पाण्याने डबडबलेल्या खाम नदीचे सर्वप्रथम दर्शन होते. निदान हा दीड किलोमीटरचा परिसर तरी स्वच्छ व्हावा यासाठी उद्योजकांनी व्हेरॉक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांना आर्थिक सहकार्य मागितले. जैन यांनीही लगेचच होकार दिला अन् खाम नदीच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला. सीआयआयचे प्रशांत देशपांडे, एन. श्रीराम सध्याचे अध्यक्ष संदीप नागोरी यांच्यासह व्हेरॉकचे अधिकारी सतीश मांडे, सीएमआयएचे पदाधिकारी प्रसाद कोकीळ, मुकुंद कुलकर्णी, आशिष गर्दे उमेश दाशरथी यांच्यासह अनेक उद्योजकांनी या कामाकडे विशेष लक्ष दिले. पुण्याच्या सेरी या कंपनीने दीड किलोमीटरच्या पात्रात ग्रीनबेल्ट तयार केला. सहा बेड तयार करून प्रथम दगड, वाळू, माती आणि त्यावर सेरी कल्चर हे त्यांचे पेटंट तंत्रज्ञान वापरले. एका आठवड्यातच दुर्गंधी नाहीशी झाली आणि शुद्ध पाणी येऊ लागले.

आदर्श उभा केला
^उद्योजकांनी संपूर्ण राज्यासमोर आदर्श उभा केला आहे. मी प्रथमच या कामाची पाहणी केली. खाम नदीचे पूर्वीचे रूप पूर्णत: बदलले असून तिला नवे जीवन मिळाले आहे. यापुढे संपूर्ण नदीचे पुनरुजीवन व्हावे. उमाकांत दांगट, विभागीयआयुक्त

तयार झाली सुंदर बाग
नदीपात्राच्या दोन्ही बाजूस सुरेख झाडी लावून परिसर सुशोभित करण्याचे काम सुरू झाले आहे. नदीपात्राचे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवता यावे यासाठी तेथे राहुट्या उभारण्यात येत आहेत. लवकरच हा संपूर्ण परिसर मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी खुला केला जाणार आहे.
विभागीय आयुक्तांसह सीआयआयचे अध्यक्ष संदीप नागोरी, एन.श्रीराम, प्रसाद कोकीळ, उमेश दाशरथी, मुकुुंद कुलकर्णी, सतीश मांडे आदींनी बुधवारी नदी पात्राची पाहणी केली.
खामनदीचा नाला झाल्याने तेथे प्रचंड दुर्गंधी होती. पात्राच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे साम्राज्य होते. त्यामुळे दीड किलोमीटर पात्रातील दोन्ही बाजूच्या परिसरातील अनावश्यक झुडपे आधी काढण्यात आली. सेरिकल्चर ट्रीटमेंटने पाणी शुद्ध होऊन त्यातील दुर्गंधी ६० टक्क्यांनी कमी झाली. आधी या ठिकाणी नाकाला रुमाल बांधून जावे लागे. आता तेथे सहजपणे फिरता येईल अशी जागा झाली आहे.


बातम्या आणखी आहेत...