आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद निवडणूक: वीस वर्षांनंतर खंडाळ्याकडे लक्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी: सलग वीस वर्षांपासून खंडाळ्याला जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी मिळालेली नाही. यंदा मात्र येथून अनेकजण इच्छुक आहेत. त्याचे कारण म्हणजे खंडाळा गट ओबीसी पुरुष वर्गासाठी राखीव झाला आहे. गावात ओबीसी मतदारही मोठय़ा संख्येने असल्याने अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
खंडाळा गटात एकूण चौदा गावांचा समावेश असून 33 हजार मतदार आहेत. त्यात सर्वाधिक मतदार एकट्या खंडाळा गावात आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून इच्छुकांची संख्याही सर्वाधिक आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली तर बंडखोरी करण्याचीही काहींनी तयारी चालवली आहे. सध्या सर्वच पक्षांनी खंडाळ्याच्या उमेदवाराला हिरवा कंदील दाखवल्याचे चित्र आहे.
कॉँग्रेसकडून चिकटगावचे विजय जाधव उमेदवारी मागत असले तरी त्यांचे प्रतिस्पर्धी खंडाळ्याचे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम पवार हे स्थानिक या मुद्दय़ावर कॉँग्रेसकडून उमेदवारी मागत आहेत. मात्र, कॉँग्रेसचे माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर हे विजय जाधव यांना उमेदवारी देतात की, खंडाळ्याच्या उत्तम पवार यांना उमेदवारी देतात हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण पवारांना उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीही होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस पक्षात गोंधळाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी या वेळी ओबीसी मतदारांची संख्या जाणून घेतली आहे. त्यानंतर स्थानिक सूरज पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मनसे पहिल्यांदाच खंडाळ्यात प्रवेश करण्यास इच्छुक आहे. जिल्हा परिषद गटासाठी बबन शिंदे यांना उमेदवारी देऊन सर्वच पक्षांना धक्का दिला आहे. बबन शिंदे यांचा खंडाळा परिसरात चांगला जम आहे. त्यांनी खंडाळ्यात अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत.
शिवसेनेने सर्वप्रथम खंडाळ्याच्या उमेदवाराला पसंती देणार असल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी निर्धार बैठकीत स्पष्ट केले आहे. भाजपने युतीला तडा देत खंडाळ्यातील सुभाष बहाळस्कर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने स्वतंत्र उमेदवार देऊन शिवसेनेपुढे आव्हान उभे केले आहे.
गेल्या वीस वर्षांत दोन वेळा चिकटगाव, एकदा वाकला व तलवाडा अशा प्रकारे खंडाळा गटातून उमेदवार निवडले आहेत. मात्र, खंडाळ्यातील स्थानिकांना उमेदवारीत स्थान नव्हते. यंदा मात्र स्थानिकांना प्राधान्य दिले जात असल्याने कार्यकर्त्यांसह इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.