आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन दिवसांत करणार साताऱ्यातील रस्त्यांची कामे, पथदिवेही बसवणार, खंडोबा यात्रेनिमित्त रस्त्यांचे पॅचवर्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साताराकरांचे ग्रामदैवत खंडोबाची यात्रा सहा दिवसांवर आली असून यात्रेदरम्यान मनपाकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी वॉर्ड अधिकारी एस. बी. ढाके यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह मंदिर परिसराची पाहणी केली. २०० मीटर रस्ता तसेच पथदिवे बसवण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण करावे असे आदेशही त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. बुधवारपर्यंत (३० नोव्हेंबर) ही कामे पूर्ण झाली तर भाविकांना दिलासा मिळणार आहे.

खंडोबा मंदिरात पाच दिवस वार्षिकोत्सव सुरू असतो. या पाच दिवसांसाठी पोलिस प्रशासन, महावितरण आणि संस्थानने नियोजन केले अाहे. मनपाची महत्त्वाची भूूमिका असूनही नियोजन केल्याने उपलब्ध होऊ शकणाऱ्या सेवासुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सोमवारी ढाके यांनी मंदिर परिसराची पाहणी करून यात्रेत सुविधा देण्याचे आश्वासन संस्थानला दिले. तसेच तत्काळ काम करण्याचे आदेशही दिले.

या वेळी संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, रमेश चोपडे, सोमीनाथ शिराणे, गंगाधर पारखे, गणेश खोरे, सुखदेव बनगर, मोहन पवार, लक्ष्मण सोलट, मोहन काळे, विजय धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. खंडोबा मंदिरामागे पुलावरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. हाच रस्ता पुढे एमआयटी महाविद्यालयाकडे जातो. या २०० मीटर रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश ढाके यांनी दिले. आवश्यकतेनुसार मुरूम टाकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पथदिव्यांसह मंदिराजवळील हॅलोजनचे दिवे बुधवारपर्यंत लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
यात्रेदरम्यान दुकानदारांना रस्ता सोडून बसता यावे, यासाठी मार्किंग करून देण्यात येणार आहे. यामुळे अनुचित प्रकार घडल्यास रुग्णवाहिका तसेच अग्निशमन विभागाची वाहने पोहोचवणे शक्य होईल. आरोग्यविषयक सुविधा देण्याबाबत आरोग्य पथकालाही कळवण्यात आले आहे. अग्निशमन बंब पुरवण्यासाठी वॉर्ड कार्यालयाकडून अग्निशमन विभागाला पत्रही देण्यात आले आहे.

मलवाहिनीच्या दुरुस्तीस सुरुवात
खंडोबामंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर अनेक दिवसांपासून घाण पाणी वाहत आहे. याबाबत वृत्त प्रकाशित करत दिव्य मराठीने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत सोमवारी दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली. यात्रेनिमित्त इतर भागातही दुरुस्त्यांची कामे केली जात आहेत.

संभाज चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक रस्ता होणार
गणेशोत्सवाच्या काळात खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या १० लाखांतून विहिरीची स्वच्छता एमआयटी महाविद्यालयाच्या रस्त्यावर पॅचवर्क करण्यात आले. आता संभाजी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्याच्या सूचनाही वॉर्ड अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.
यात्रोत्सवातील लिलावही पूर्ण
औरंगाबाद - खंडोबायात्रे निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी तीन वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा लिलाव सोमवारी झाला. यात सर्वाधिक ४३ हजारांची बोली लागली. दुकानांकडून वसुली करण्यासाठी अडीच हजारांची बोली लागली. यातून संस्थानला ४५ हजार पाचशे रुपयांचे उत्पन्न मिळाले.

राज्यभरातील भाविक या वार्षिक यात्रोत्सवात सहभागी होतात. त्यांना वाहतूक कोंडीला सामाेरे जावे लागू नये, यासाठी वाहनतळाची सुविधा पुरवण्यात येणार आहे. नियमांनुसार भाविकांकडून केवळ पाच, दहा किंवा १५ रुपये घ्यावे, या पेक्षा जास्त रकमेची मागणी केल्यास त्या त्या वाहनतळाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा संस्थाकडून देण्यात आला आहे. त्यासह पान फुलाच्या दुकांनाकडून ५० रुपये, हॉटेल खानावळ १५० रुपये, चहा टपरी, कटलरी यांच्याकडून शंभर रुपये, फरसाण, हलवाई, भांडी दुकान, रहाट पाळणे यांच्याकडून २०० रुपये, छोट्या दुकानांसाठी ५० रुपये घेण्यात येणार आहेत. त्याची नियमावलीही तयार करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...