आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टाचे निर्देश, तरीही मालमत्ता खरेदीधारकांचे नोंदणीसाठी खेटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - मुद्रांक व नोंदणी विभागात मालमत्तांच्या नोंदणीची माहिती तहसील, सिटी सर्व्हे विभागात मालमत्ता खरेदीदाराने देण्याची गरज नाही. ती शासकीय यंत्रणेमार्फतच झाली पाहिजे, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने चार वर्षांपूर्वी दिले. तरीही नोंदणीत त्रुटी असल्याचे कारण दाखवून मालमत्ताधारकाकडूनच कागदपत्रे मागवली जात आहेत. 
 

भारतीय नोंदणी कायदा १९०७ चे कलम १७ नुसार १०० रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या चल, अचल संपत्तीच्या खरेदीखत, भाडेकरार, बक्षीसपत्र, वाटणीपत्र व गहाणखताची नोंदणी बंधनकारक आहे. त्यात मुद्रांक व नोंदणी विभागाचे सहनिबंधक फी आकारून दस्त नोंदणी करतात. शहरात सिटी सर्व्हे विभाग आखीव पत्रिकेवर (पीआर कार्ड) तर ग्रामीण भागात सातबाऱ्यावर नोंद होते. ही माहिती नोंदणी विभागानेच तलाठी सज्जा अथवा सिटी सर्व्हे विभागास देणे गरजेचे आहे. नोंदणी विभागाने प्रत्येक महिन्याला मालमत्तांच्या नवीन नोंदणीचे प्रपत्र अ तयार करावे आणि संबंधित तहसिल अथवा सिटी सर्व्हे विभागास पाठवावे, असे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १४९ ते १५४ मध्ये म्हटले आहे.
 
 
आश्वासन पाळलेच नाही
कायद्यातील तरतुदीनुसारच कार्यवाही व्हावी, यासाठी शोधन यशवंत जोशी यांनी २०१३ मध्ये  मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आश्वासन देऊनही पाळले नाही. तेव्हा प्रत्येक प्रकरण तपासून पाहा, गरज भासल्यास कागदपत्रे मागवा, असे आदेश देण्यात आले. याविषयी नोंदणी कार्यालयातील सहनिबंधक जी. एस. कोळेकर म्हणाले की, सर्व व्यवहार ऑनलाइन असल्याने पुन्हा कागदपत्रे देण्याची गरज नाही. फक्त म्हाडा आणि सिडकोच्या मालमत्ता भाडेपट्ट्यावर असल्याने त्यासाठी कागदपत्रे आॅनलाइन पाठवण्याची गरजच नाही.
 
 
विलंबामुळे नक्कलची गरज
आॅनलाइन असूनही मालमत्ता नोंदणी संथगतीने होते. सहा महिने ते एक वर्षापर्यंत प्रक्रिया चालते. त्यामुळे मालमत्ताधारकांना घाई असते. अशावेळी तलाठी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती घेतात.
सतीश तुपे, अध्यक्ष, तलाठी महासंघ, महाराष्ट्र राज्य
 
 
म्हाडाला प्रपत्र मिळत नाही
म्हाडातर्फे दस्त नोंदणीसाठी कागदपत्रे दिली जातात. नोंदणी झाल्याची छायांकित प्रत मालमत्ताधारकच आणून देतो. नोंदणी कार्यालयाकडून एकही कागद मिळत नाही. 
 एस. एस. बहुरे,
मिळकत व्यवस्थापक म्हाडा.
 
 
 
विसंगती टाळण्यासाठी 
नोंदणी विभागाने पाठविलेल्या माहितीत विसंगती, त्रुटी असतात. त्यामुळे मालमत्ताधारकांकडून त्याच्या नावाचा उल्लेख असेलेल सूची दोनचे प्रमाणपत्र व नोंदणीची छायांकित प्रत घेतली जाते.
गणेश सोनार, नगर भूमापन अधिकारी, आैरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...