आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोतकरांच्या 187 क्विंटल तुरीची एकाच दिवशी खरेदी, गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - तूर खरेदी होत नाही म्हणून राज्यभरातील सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असतानाच शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची जालना येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर एकाच दिवशी 187 क्विंटल, तर त्यांचे भाऊ आणि भावजयीच्या नावावर 190 क्विंटल अशी तब्बल 377 क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सध्या जिल्ह्यातील संपूर्ण तूर खरेदीची चौकशी सुरू आहे. त्यात खोतकरांचीही  तूर आहे.
 
जालना जिल्ह्यातील नाफेडच्या जालना, परतूर, तीर्थपुरी, अंबड अशा चार तूर खरेदी केंद्रांवर 9 हजार 568 शेतकऱ्यांकडून सुमारे 5 लाख 55 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, या तूर खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्री करून शासनाची फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
 
जालना जिल्ह्यात एवढी मोठी तूर कुठून आली याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहायक निबंधक, जिल्हा पणन अधिकारी यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या चौकशीत जालना जिल्ह्यातील ८०० शेतकऱ्यांची तूर खरेदी संशयास्पद आढळून आली आहे.
 
या यादीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मे रोजी या ८०० शेतकऱ्यांची यादी जालना पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवून चौकशीचे आदेश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...