आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि अपहृत चिमुरड्या चार दिवसांनी सुखरूप परतल्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार दिवसांनंतर घरी सुखरूप पोहोचलेल्या वैष्णवी आणि शीतलला घेऊन त्यांची आई पोलिस ठाण्यात हजर झाली. - Divya Marathi
चार दिवसांनंतर घरी सुखरूप पोहोचलेल्या वैष्णवी आणि शीतलला घेऊन त्यांची आई पोलिस ठाण्यात हजर झाली.
औरंगाबाद- वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी भागातील अपहृत बहिणी चार दिवसांनंतर घरी सुखरूप परतल्या. वस्तीत राहणाऱ्या नानासाहेब ऊर्फ नाना अभंग यानेच त्यांचे अपहरण केले होते. सुमारे ५०० कि.मी. पर्यंत दोघी बहिणींना फिरवून त्याने मंगळवारी सकाळी श्रीरामपूरजवळील बाभळेश्वर येथून शीतल आणि वैष्णवी यांना औरंगाबादच्या बसमध्ये बसवून देऊन स्वत: पसार झाला. मुली पंढरपूरला उतरून अॅपे रिक्षाने घरी पोहोचल्या, अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिली. दरम्यान, सायंकाळी नाना अभंग हा मुकुंदवाडीत एका महिलेकडे थांबला असल्याची खबर लागताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

२१ एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शीतल ज्ञानोबा रासवे (१०) आणि वैष्णवी (१२) या दोघी बहिणी शाळेतून परीक्षा देऊन घरी परतत होत्या. घर शाळेदरम्यानच्या निर्मनुष्य भागात नानाने या मुलींना गाठले. “तुम्हाला घरी सोडतो’ असे सांगून त्याने मुलींना एम-८० गाडीवर बसवले. काही अंतर पार केल्यानंतर नर्सरीतून काही रोपे घ्यायची आहेत, ती पकडण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत चला, असे म्हणत त्याने दोघींना गावाबाहेर नेले. नंतर त्याने थेट खुलताबाद आणि नंतर फुलंब्री, भोकरदन, देऊळगाव राजा, बुलडाणा, भुसावळ, वाशीम असा प्रवास केला. देऊळगाव राजा येथे मुलींना नवीन ड्रेस खरेदी करून दिला. परत येताना धुळेमार्गे तो श्रीरामपूरजवळील बाभळेश्वरला पोहोचला. 

दरम्यान, त्याने काही वेळा आपल्या मुलाशी आणि पत्नीशी मोबाइलवरून संपर्क साधला असता कुटुंबीयांनी पोलिस आम्हाला अटक करणार आहेत. आमची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मंगळवारी पोलिस त्याच्या मागावर असतानाच त्याने सोमवारी सकाळी बाभळेश्वर येथून मुलींना बसमध्ये बसवून देऊन तो पसार झाला. मुली वाळूजला पोहोचल्यानंतर रिक्षा करून घरी पोहोचल्या. 

मुली बेपत्ता झाल्यापासूनच नानासाहेबही गायब असल्याने पोलिसांचा त्याच्यावर दांट संशय होता. पोलिस त्याच्या कुटुंबीयांवर लक्ष ठेवून होते. अपहरणानंतर दोन दिवसांनंतर गल्लीतल्या मुली घरी आल्या का, असे त्याने पत्नीला फोनवर विचारले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळवला. किनगाव राजा येथे घरकुल योजनेत घर मिळाले असून मी त्याच ठिकाणी असल्याचे तो कुटुंबीयांना सांगत होता. 

शहर पोलिसांना झोप नाही 
अपहृत मुलींच्या शोधासाठी वाळूज एमआयडीसी, गुन्हे शाखा, सायबर सेल आणि संपूर्ण मुख्यालय मुलीचा शोध घेत होते. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, सहायक आयुक्त नागनाथ कोडे, रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक नाथा जाधव, मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांची झोप उडाली होती. या शिवाय उपनिरीक्षक अनिल वाघ, विजय पवार, शेख ताहेर, लक्ष्मण उमरे यांचे पथक वेगवेगळ्या जिल्ह्यांत तपास करत होते. उपनिरीक्षक हेमंत तोडकर, माधव कोरंटलू, आरती जाधव या पथकात होते. पोलिस आयुक्त अमितेशकुमार रजेवर असतानाही ते या प्रकरणाची माहिती घेत होते. 

अपहरण नेमके कशासाठी? 
अपहृतमुलीचे कुटुंबीय अतिशय गरीब असून मोलमजुरी करतात. त्यामुळे नानाने खंडणीसाठी नव्हे तर गुप्त धनाच्या लालसेने नरबळी देण्यासाठी अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्या घरातून एक मांडूळ सापडले असून मांडूळ गुप्त धन शोधण्यास मदत करते अशी अंधश्रद्धा आहे. त्याच्या घरातून देवीची मूर्तीही सापडली आहे. शिवाय विक्रीसाठीदेखील त्याने मुलींचे अपहरण केले होते का, या दिशेनेही तपास सुरू आहे. या चार दिवसांत आरोपीने मुलींना कुठलाही अपाय केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अमावास्येची होती भीती 
मुलींचे अपहरण गुप्तधनासाठी केल्याचा संशय असल्याने अमावास्येला नरबळी दिला जातो, असा समज आहे. त्यामुळे अमावास्या सुरू होण्यापूर्वीच मुली सापडणे आवश्यक होते. यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत होती. मंगळवारी दुपारनंतर अमावास्या सुरू होते. त्यामुळे पोलिसांनी जोमाने तपास सुरू केल्याने आरोपीने नांग्या टाकत मुलींना बसमध्ये बसवून देऊन पसार झाला. मात्र सायंकाळी तो सापडला. 

नाना गुन्हेगारी वृत्तीचा, बलात्काराचाही गुन्हा
नाना हा मूळचा सिंदखेडा राजा येथील असून १५ वर्षांपूर्वी पत्नीशी भांडण झाल्याने तो वेगळा राहत होता. त्याची पत्नी वाळूज परिसरात राहण्यास आली असता त्याने सिंदखेडा राजा येथे एक बाई ठेवली होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी ती निघून गेल्याने नानासाहेब पत्नीकडे राहायला आला होता. नानाला दोन मुले असून तो वाळूजला खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याने नागपूर येथे तोफ चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्यावर वारखेडी पोलिस ठाण्यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. 

काका तो ताईला नेहमी चॉकलेट देत असे 
शीतल आणि वैष्णवी यांना तिसरीत शिकणारी आणखी एक लहान बहीण आहे. या तिघी नेहमी शाळेत सोबत राहत. पोलिसांनी तिचा जबाब घेतला असता नाना ताईला नेहमी चॉकलेट देऊन फिरायला घेऊन जात होता, असे सांगितले. तिच्या एका मैत्रिणीनेही असाच जबाब दिला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. चार दिवस त्याने मुलींना धमकावत मला पप्पा म्हणा, असे सांगत असे. मात्र, मोठ्या मुलीने मी तुम्हाला पप्पा म्हणणार नाही, असे स्पष्ट सांगितल्यानंतर मामा म्हणा, असे त्याने सांगितले. मुली रडल्या तर मी तुमच्या आई वडिलांना मारून टाकीन. तुम्हाला पारध्याच्या ताब्यात देईन, असे तो धमकावत होता, असे मुलींनी पोलिसांना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...