आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडीतील खिचडीत निघाल्या अळ्या, सोंडकिडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज-पंढरपूर येथील अंगणवाडी क्र. 7 मध्ये बालकांना दिल्या जाणार्‍या सकस आहारात अळ्या आणि सोंडकिडे निघाले आहेत. चंदेरी बचत गटाकडे सकस आहार बनवण्याचे कंत्राट आहे. खिचडीत अळ्या, केस आणि सोंडकिडे निघाल्यामुळे या बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळी अंगणवाडीसमोर गर्दी केली.
येथील गणेशनगर भागात अंगणवाडी क्रमांक 7 ही भाड्याच्या खोलीत भरते. तेथे रुक्मिणी जनार्दन खोतकर या अंगणवाडी कार्यकर्ती, तर सीमा गायकवाड या मदतनीस म्हणून काम पाहतात. या अंगणवाडीत रेकॉर्डवर 35, तर प्रत्यक्षात 25 बालकच उपस्थित असतात. अंगणवाडीतील बालकांसाठी सकस आहार योजनेअंतर्गत खिचडी बनवण्याचे काम चंदेरी बचत गटाकडे देण्यात आले आहे. या बचत गटाच्या माध्यमातून दररोज बालकांना खिचडी दिली जाते. मागील अनेक दिवसांपासून तांदूळ स्वच्छ न करता तसाच खिचडीसाठी टाकला जातो. शुक्रवारी खिचडीत अळ्या, सोंडकिडे आणि केस निघाले. त्यामुळे या अंगणवाडीसमोर महिला पालकांनी साडेअकराच्या सुमारास एकच गर्दी केली.
हा प्रकार बालकांच्या आरोग्याशी खेळणारा
पालकांनी अंगणवाडी सेविकेची चौकशी केली. मात्र, अंगणवाडी सेविका रजेवर असल्याचे मदतनीस सीमा गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त पालकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सकस आहार योजनेंतर्गत बनवलेली उंदरांच्या लेंड्या, सोंडकिडे, केसमिर्शित खिचडी दाखवली.
अंगण्यावाडीतील बालकांना बसण्यासाठीची व्यवस्था आणि त्यालगतच स्वच्छतागृह असल्याने हा संपूर्ण प्रकार बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा असल्याचा आरोपही पालकांनी केला. या वेळी विमलबाई दाभाडे, लक्ष्मीबाई साठे, मोहिनी सौदागर, ताराबाई सौदागर, मंदा गायकवाड, पुष्पा जाधव, सोनाली गांगुर्डे, जमुना सुनील आव्हाड यांच्यासह 50 वर महिला पालकांची उपस्थिती होती.