औरंगाबाद - अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांचे वेतन रोखल्याच्या निषेधार्थ गुरुवारी आयटकप्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी हक्काची भाऊबीज मिळालीच पाहिजे, होश मे आओ युती शासन, होश मे आओ आदी घोषणांनी जिल्हा परिषद मुख्यालय दणाणून गेले होते.
महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने त्याची कोणतीच दखल घेतली नाही. कोट्यवधी रुपयांचा चिक्की घोटाळा करणाऱ्या शासनाला अनावश्यक बाबी अंगणवाडीच्या माथी मारण्यात रस आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसल्याने वारंवार निदर्शने तसेच मोर्चे काढावे लागत आहेत.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. राम बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉ. तारा बनसोडे, अनिल जावळे, अॅड. अभय टाकसाळ, विलास शेंगुळे, शीला साठे, देविदास राजाळे, सुनीला गवळीकर, मीरा अडसरे, संगीता अंभोरे, मनीषा भोळे, अनिता पावडे, रंजना राठोड, नूरजहाँ पठाण, चंचल खंडागळे, सुनीता शेजवळ, प्रमिला शिंदे, ललिता दीक्षित, संगीता वैद्य, सुनीता वायकोस, जयश्री धीवर आदींची उपस्थिती होती.
घोटाळ्यांची चौकशी करा
युतीशासनाच्या काळात झालेल्या चिक्की, वॉटर फिल्टर घोटाळ्यांची चौकशी करण्यात यावी, सात महिन्यांच्या नियमित वेतनासह एक एप्रिल २०१४ पासून वाढीव ५०० रुपयांचे मानधन देण्यात यावे, गेल्या वर्षीची थांबवलेली भाऊबीज देण्यात यावी, मानधनाची स्लिप द्यावी, वेळेवर इंधन बिल देण्यात यावे, प्रवास भत्ता वेळेत मिळावा, पतसंस्था सभासदांचे शेअर्स कर्जाचे हप्ते कपात करावे, साहित्य वेळेवर देण्यात यावे, औषधांचा पुरवठा अंगणवाड्यांना केला जातो. त्यामुळे मुलांसह गरोदर महिला किशोरींना सांभाळण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांवरच येऊन पडते. ही जबाबदारी आरोग्य केंद्राकडे देण्यात यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
१५०० अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
७ महिन्यांचे वेतन रोखल्याने शासनाचा निषेध