आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप शहराध्यक्षपदाचा कारभार गुलमंडीवरूनच चालणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जुन्या धुरीणांच्या कडव्या विरोधानंतरही भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचीच निवड करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीत गुलमंडी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणारे तनवाणी यांच्याकडेच शहराचा कारभार देण्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठरवले होते. त्यानुसार ही निवड करण्यात आली. त्यांच्या नावाला विरोध करणाऱ्यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यामुळे तनवाणी यांना येत्या काळात जुन्या-नव्यांना सोबत घेताना कसरत करावी लागणार असे संकेत या वेळी मिळाले.

शहराध्यक्ष निवडीसाठी रविवारी सकाळी पक्षाच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात पक्षनिरीक्षक सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अवघ्या २० मिनिटांत निवडणुकीचे सोपस्कार पूर्ण झाले आणि तनवाणी हे पुढील तीन वर्षांसाठी पक्षाचे शहर कारभारी असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

उघड नाराजी : तनवाणीयांची निवड जाहीर होण्यापूर्वीच प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरिये तातडीने बैठकीतून बाहेर पडले. शुभेच्छा देताना मावळते शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनाही नाराजी लपवता आली नाही. माजी उपमहापौर संजय केणेकर यांनीही हा पक्ष विचारधारेचा असून त्याच विचारधारेने पक्ष पदाधिकाऱ्यांना चालावे लागेल, असे टोमणा लगावला.

शहरप्रमुख ते शहराध्यक्ष
शिवसेनेत तनवाणी हे कडवट शिवसैनिक म्हणून परिचित होते. १९९६ च्या सुमारास ते शहरप्रमुख होते. हिंदुत्ववादी पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपचे ते शहरप्रमुख झाल. एका पक्षाचा शहराध्यक्ष राहिलेला कोणताही पदाधिकारी दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याच पदावर जाऊ शकला नाही.

दुष्काळाचा विसर...
पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुष्काळाचा विसर पडला. तीन मिनिटे फटाक्यांची लड वाजत होती. तनवाणी यांच्या गळ्यात पाच ते दहा किलोंचे हार घालण्यात आले होते. पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक देण्याचा विचार पक्षनेत्यांनी ठेवला असला तरी येथेही पुष्पगुच्छांचा खच होता.

घुसमटदाबी केल्याची चर्चा
तनवाणीयांची निवड करण्यासाठी श्रेष्ठींनी अन्य पदाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषी केली. त्यांचे ऐकून घेतले नाही, अशी चर्चा निवडीनंतर सुरू होती. जालना, औरंगाबादेत झालेल्या चर्चेदरम्यान तनवाणींना विरोध करणाऱ्यांना प्रदेशाध्यांनी सुनावल्याचेही काहींनी सांगितले.

वाद होणार नाही
^तनवाणी हे आक्रमक नेते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी दिल्याने शहरात पक्ष वाढीस मदत होईल. त्यांनी अख्खे शहर भाजपमय करावे, अशी आमची इच्छा आहे. ते अनुभवी आहेत. त्यामुळे जुना किंवा नवा असा वाद पक्षात होणार नाही. - आ. सुरेश देशमुख, पक्षनिरीक्षक.