आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर सुरूच नाही, तर भ्रष्टाचार कसा ? - किशनचंद तनवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपा निवडणुकीत भाजपच्या प्रचार समितीचे सहप्रमुख, माजी आमदार किशनचंद तनवाणी सव्वा वर्ष महापौर, त्याआधी सभागृह नेताही राहिले. त्यांना मनपाच्या अर्थकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी "गप्पा डावपेचांच्या' सदरात संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. मनपात भ्रष्टाचार होतो, या आरोपाशी ते सहमत नाहीत. ते म्हणतात, उन्नीस-बीस असेल; पण भ्रष्टाचार फारसा नाही. समांतर योजना अजून सुरूच झाली नाही, तेव्हा भ्रष्टाचाराचा प्रश्न येतोच कोठे, असा प्रतिप्रश्न करत माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात आखलेली समांतर योजना लोकांसाठी अधिक उपयुक्त होती, असा दावा त्यांनी केला.

श्रीकांत सराफ : तुम्ही एक एकदम कडवट शिवसैनिक. तरीही विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश का केला? तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाहीत?
- मी ३० वर्षे शिवसेनेत काम केले. अपवाद वगळता शिवसेना कधीही सत्तेत नव्हती. त्यामुळे भाजपमध्ये आल्यानंतर राज्यात त्यांची सत्ता आली. तेव्हा मी आत्ता सत्तेत आलो असे म्हणता येईल. मी मध्यमधून शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती; जैस्वाल यांनी २००९ मध्ये बंडखोरी केली होती. नंतर ते शिवसेनेत परत आले. परंतु पक्षाने जैस्वाल यांचेच नाव फायनल केले. मग ऐनवेळी युती तुटली. समोरून संधी आली म्हणून मी भाजपमध्ये गेलो. अन्यथा मी शिवसेना सोडलीच नसती. अपक्ष म्हणून लढणे किंवा बंडखोरी करण्याचा विचार मी कधी केला नाही. मी शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षाकडून लढलो, बंडखोरी केली नाही. एक नक्की, स्थानिक नेत्यांवर मी नाराज होतो. मात्र, आता माझा कोणावरही आरोप नाही.
हरेंद्र केंदाळे : तुमच्या मैत्रीत यामुळे काही फरक पडला?
- अजिबात नाही. आम्ही आधीही मित्र होतो, आजही मित्र आहोत. राजकारणात असे चालतच असते.
परवेज खान : मुस्लिम समाजाशी तुमचे संबंध चांगले आहेत, म्हणूनच तुम्ही गुलमंडीवरून स्वत:च्या भावाला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले, हे खरे आहे का? आता तुम्ही भावाचा प्रचार करणार की पक्षाचा?
- गुलमंडी हा वाॅर्ड शिवसेनेला सुटला आहे. माझे भाऊ राजू तनवाणी हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. युतीमध्ये भाजपला ४९ वाॅर्ड सुटले. त्यातील ४३ जागांवर भाजप लढत आहे. सहा ठिकाणी आम्हाला उमेदवार मिळाले नाहीत. पक्षाने सहप्रचारप्रमुख या नात्याने माझ्यावर ४३ वाॅर्डांची जबाबदारी टाकली असून त्यावरच माझे लक्ष केंद्रित आहे.
संतोष देशमुख : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तुम्ही भाजपला दगाबाज म्हटले होते. आता त्याच पक्षात गेलात?
- तेव्हा भाजपने शिवसेनेला मदत केली नाही. त्यांनी अपक्षाला मतदान केले. दुसऱ्या क्रमांकाची मते दिली हे खरे असले तरी युतीचा धर्म त्यांनी पाळला नाही. त्यामुळे मी फक्त शिवसेनेचाच उमेदवार असे म्हणालो होतो.
शेखर मगर : पालिका निवडणुकीत काही बंडखोर प्रचारात तुमचा फोटो वापरताहेत...
- वापरत असतील. मी शिवसेना सोडली तरी माझ्या कार्यालयात आजही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यामुळे फोटो लावतो. माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते जर फोटो लावत असतील, तर त्याला मी काय करणार? तो प्रेमाचा भाग असतो. त्याला तुम्ही-आम्ही रोखू शकत नाही.
दत्ता सांगळे : भाजपला मोठा भाऊ होण्याची घाई झाली आहे, युती न झाल्याने ते शक्य होईल का?
- युती झाली नसती तर भाजपच्या ४५ जागा आल्या असत्या. पण युती व्हावी असा आदेश होता. त्यानुसार युती झाली. आमच्या वाट्याला ४९ जागा आल्या. त्यातील ४३ आम्ही लढत आहोत. त्यातून ३५ जागा आम्ही जिंकू असा विश्वास आहे. सेनेला मागे टाकणे हा उद्देश नव्हता. एमआयएम, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांना दूर ठेवण्यासाठी युती झाली. आम्ही आमचा उद्देश साध्य करू.
महेश देशमुख : युतीसाठी १३ बैठका झाल्या. त्यात तनवाणी विरुद्ध सेना असेच चित्र दिसले. तुम्ही डावपेचांत सेनेला भारी पडलात?
- असे अजिबात नाही. कोअर कमिटीच्या बैठकीत दोन्हीकडून प्रत्येकी चार जण एकत्र येत. बाहेर कोणी चुकीची माहिती दिली हे मी मला माहिती नाही.
सतीश वैराळकर : सेना हा आक्रमक पक्ष आहे. आता तुम्ही शिस्तीच्या पक्षात गेलात, तेथे करमते का?
- आधीही युतीत आम्ही एकत्र काम केले. त्यामुळे हा पक्ष नवीन मुळीच नव्हता. राहिला पक्ष आक्रमकता अन् शिस्तीचा, तर सेनेचे कार्यकर्ते शिस्तीत काम करतात अन् भाजपचे कार्यकर्तेही आक्रमकपणे एकमेकांशी भांडतात. त्यामुळे तसे काहीही नाही.
मंदार जोशी : भाजपमध्ये परकेपणा जाणवतो का?
- अजिबात नाही. मी आधीच म्हटले, आम्ही युतीत एकत्र काम केले आहे. आज फक्त इकडे आहे. तुम्ही असे म्हणू शकता की मी आधी माहेरी होतो, आता सासरी आलो. माहेरची आठवण येते; पण सुनेला सासरीच राहावे लागते.
भरत जाधव : सासरी काही सासुरवास?
- अजिबात नाही. माहेरीही काही कुरबुरी होत्याच. येथेही असतील. पण सासर सोडून पुन्हा माहेरी जावे अशी परिस्थिती नाही. सूनही सुखी आहे अन् सासरही. त्यामुळे यावर कोणी चर्चा किंवा चिंता करण्याची गरज नाही.
अरुण तळेकर : सेनेने खूप पदे दिली तरी तुम्ही पक्ष का सोडला?
- मी ३० वर्षे सेनेत काम केले. माझ्यात क्षमता होती म्हणून मला शहरप्रमुखपद मिळाले. तेथेही मी काम केले. क्षमता होती म्हणून नगरसेवकपदाचे तिकीट देण्यात आले. मी निवडून आलो. क्षमता होती म्हणून महापौर झालो अन् पुढे आमदारही. त्यामुळे मी शिवसेनेवर नाराज मुळीच नाही. युती झाली नाही म्हणून मी भाजपमध्ये गेलो. भाजप म्हणजे मित्रपक्षच. त्यामुळे मी बंडखोरी वगैरे केली असे कोणी म्हणू शकत नाही.
प्रश्न : समांतरचा पहिला प्रस्ताव तुम्ही महापौर असतानाच मंजूर झाला. त्याचे पुढे काय झाले? - मी महापौर असताना अशासकीय प्रस्ताव घेऊन समांतरला मंजुरी दिली होती. ती बीओटी तत्त्वावर होती. म्हणजे ठेकेदाराने फारोळ्यापर्यंत पाणी आणून द्यावे. आम्हाला लागेल तेवढे पाणी आम्ही घेऊ, त्याचे पैसे देऊ. उरलेले पाणी त्याने सिडको, एमआयडीसी किंवा अन्य उद्योगांना विकावे. पाणीपट्टी वसुली पालिकाच करणार होती. त्यामुळे नागरिकांवर भुर्दंड पडण्याचा प्रश्नच नव्हता. ३० वर्षांनंतर ही योजना पालिकेच्याच ताब्यात येणार होती. पण पुढे करारात बदल होत गेले अन् आता ठेकेदारच पाणीपट्टी वसूल करतोय.
विद्या गावंडे : भाजपमध्ये तुम्हाला अजून योग्य ते स्थान मिळाले नाही. त्यामुळे मनपा निवडणुकीत स्वत:ची ताकद सिद्ध करणार का?
- ज्या पक्षात आहे तेथे ताकद सिद्ध करण्याची गरज नाही. पक्षाचे काम करत राहायचे, ते मी करतोय.
रोशनी शिंपी : समांतरला कोणामुळे विलंब झाला? आणि तुम्ही आखलेली योजना चांगली होती की सध्याची?
- सर्वांनाच माहिती आहे, नेमका कशामुळे उशीर झाला ते. आणि अर्थातच मी आखलेली योजना लोकांच्या खूपच फायद्याची आणि सुटसुटीत होती. अर्थातच तेव्हाची. तेव्हा ठेकेदाराचा जनतेशी काहीही संबंध येणार नव्हता. आता ठेकेदार पाणीपट्टी वसुली करतोय. करारात बदल झाले नसते तर ही योजना चांगलीच राहिली असती. पण शासनाने अनुदान दिले तेव्हा काही अटी घातल्या गेल्या. त्यानुसार करारात
बदल झाल्याचे सांगितले जाते. त्याला कोण जबाबदार आहे हे समोर येईल.
सतीश वैराळकर : भाजप स्वतंत्र लढला असता तर त्यांचा समांतर योजनेतील भ्रष्टाचार हाच प्रचाराचा मुद्दा असता?
- समांतर ही शहराची गरज आहे, अन्यथा आपल्याला पाणी मिळणार नाही. नागरिकांना पाणी हवे आहे.
महेश देशमुख : थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची मागणी तुम्ही का फेटाळता?
- आम्ही कशाला फेटाळू? विरोधकांनी समांतरमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे. आमचे सरकार आहे, तेव्हा आम्हीच याची चौकशी करू. थर्ड पार्टीकडूनही चौकशी करू. थर्ड पार्टी इन्स्पेक्शनला आमचा १०० टक्के पाठिंबा आहे.
भरत जाधव : तुमच्या काळात सुरू झालेली सिटी बस कोठे गायब झाली?
- खासगी तत्त्वावर आम्ही सिटी बस सुरू केली होती. ९५ बस शहरात धावतील असे ठरले होते. धावल्या फक्त ५०. पुढे त्यांना दरवाढ करून देणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती, वाढते पगार या फेऱ्यात ते तगले नाहीत. समितीने त्यांना तिकीट दरवाढ करून दिली नाही. त्यामुळे ठेकेदार सोडून गेला. शासनानेही मदत केली नाही.
भरत जाधव : आता तुमचे सरकार आहे. तेव्हा पुन्हा सिटी बस सुरू होईल?
- महानगरपालिका ही सेवा सुरू करू शकत नाही. ही सेवा तोट्यात आहे. तो तोटा सहन करण्याची क्षमता पालिकेकडे नाही. त्यामुळे एसटी महामंडळामार्फतच ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न होईल. दिवाकर रावते हे परिवहनमंत्री आहेत. तेही या सेवेबाबत पॉझिटिव्ह आहेत. तेव्हा सेवा सुरू होईल, पण महामंडळामार्फत.
रोशनी शिंपी : २५ वर्षांच्या सत्तेत पालिका प्रगती का करू शकली नाही?
- प्रगती करण्यासाठी पैसे लागतात. शासनाकडून अनुदान मिळत नव्हते. कारण राज्यात सत्ता नव्हती. शहरात पाणीपट्टी व मालमत्ता कराची वसुली पूर्ण क्षमतेने होत नव्हती. जकात किंवा आताचा एलबीटी हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. पैसे असल्याशिवाय कामे करता येत नाहीत. तरीही शक्य होईल तेवढी कामे या स्थानिक स्वराज्य संस्थेने केलीच.
विद्या गावंडे : कामाची गुणवत्ता चांगली नसल्याने खर्च वाया जातो, असे वाटत नाही का? म्हणजे १ कोटीचा रस्ता सांगितला जातो, प्रत्यक्षात ३० लाखांचे काम होते अन् ७० लाख अधिकारी, ठेकेदाराच्या खिशात जातात.
- असे होते हे मला मान्य नाही. आता तर ऑनलाइन टेंडर प्रक्रिया आहे. त्यामुळे मोठ्या कामांत गैरव्यवहार होत असेल हे पटत नाही. लहानमोठ्या कामांत गडबड होत असेल हे मी समजू शकतो.
दत्ता सांगळे : महानगरपालिकेत भ्रष्टाचार होत नाही, असे तुम्हाला म्हणायचे का? समांतरचे काय ?
- उन्नीस-बीस असेल, पण महापालिकेत भ्रष्टाचार होत नाही. पाचही बोटे सारखी नसतात. काही जण तसे करत असतीलही; पण पूर्ण महानगरपालिकाच भ्रष्टाचारी आहे असे म्हणता येणार नाही. मोठ्या कामात अजिबात भ्रष्टाचार होऊ शकत नाही. समांतर योजनाच अजून सुरू झाली नाही, तेव्हा भ्रष्टाचार कसा होईल?
मंदार जोशी : खासगीकरण, पक्ष सोडणे यामुळे तुम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले?
- मला कोणी आरोपीच्या पिंजऱ्या उभे केले ते आधी सांगा, म्हणजे मी आरोपी आहे की नाही, हे सांगेन. खासगीकरणाची सुरुवात मी केली. जकातीच्या खासगीकरणाला सर्वांनीच विरोध केला, पण पहिल्याच वर्षी पालिकेचे उत्पन्न ४० कोटींनी वाढले. यात फायदा कोणाचा झाला, शहराचाच ना! आता बीओटी किंवा खासगीकरणाशिवाय पर्याय नाही, हे समोर आलेच.
हरेंद्र केंदाळे : एमआयएम हे संकट वाटते का?
- कसले संकट! युती सत्तेत असताना त्यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात काय केले, काहीच नाही. तेव्हा त्यांचा एक आमदार निवडून आला, आता काही नगरसेवक निवडून येतील तर ते काय करतील, काहीच नाही. काहीही होणार नाही. कसलाही तणाव किंवा धार्मिक तेढ होणार नाही.
भरत जाधव : सेना म्हणते आधी हिंदुत्व, नंतर विकास; तुम्ही म्हणता आधी विकास, नंतर हिंदुत्व
- बरोबर आहे. आमच्यात युती आहे, हिंदुत्वाची जबाबदारी त्यांच्यावर अन् विकासाची जबाबदारी आमच्यावर.
हरेंद्र केंदाळे : मावळत्या महापौर कला ओझांना तुम्ही १० पैकी किती गुण द्याल?
- त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे मी त्यांना सर्वच्या सर्व गुण देईन.
शब्दांकन : दत्ता सांगळे, छायाचित्र : अरुण तळेकर