आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणच्या पाण्यासाठी हवेत 12 हजार कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कोकणचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी 12 हजार कोटींवर खर्च लागणार आहे. कोकणातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे 115 टीएमसी पाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गोदावरी खोर्‍यात आणल्यास मराठवाड्याचे चित्र बदलू शकते. मात्र त्यासाठी सरकारने प्रबळ इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे असल्याचे मत तत्कालीन महाराष्ट्र पाणी परिषदेचे अध्यक्ष, आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले.

कोकणातील नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी वळवून मराठवाड्यात आणले पाहिजे, अशी भूमिका कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतल्यानंतर त्याबाबत वादविवाद सुरू आहेत. महाराष्ट्र पाणी परिषदेने पाणी वळवण्याबाबतचा अहवाल 2003 मध्ये दिला होता. या अहवालात पाणी परिषदेने आंतरखोरे पाणी परिवहनाचे 13 प्रस्ताव दिले होते. याज उत्तर कोकणातील पाणी उपसा करून गोदावरी खोर्‍यात वळवणे, घाटमाथ्यावरील नाले आणि उध्र्व वैतरणाचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवणे, वैनगंगा खोर्‍याचे पाणी मांजरा खोर्‍यात वळवणे यासह 13 प्रस्ताव आहेत. 2003 मध्ये या परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष आमदार गणपतराव देशमुख, तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यासह हा अहवाल शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांनाही दिला होता.

कोकणातील नद्यांचे पाणी हक्काचे
महाराष्ट्रात पाच प्रमुख नदीखोरे आहेत. ज्यामध्ये 4667 टीएमसी पाणी आहे. यामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा आणि कोकण खोरे आहे. पहिल्या चारही नद्यांचे खोरे महाराष्ट्रासह इतर राज्यांत असल्यामुळे इतर राज्यांनाही वाटा द्यावा लागतो. कोकणचे खोरे पूर्णत: महाराष्ट्राच्या हक्काचे आहे.

तंत्रज्ञानामुळे पाणी आणता येणे शक्य
मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी आणण्याचा चांगला पर्याय आहे. त्यामुळे मराठवाड्याचे चित्र बदलू शकते. 2003 मध्ये आम्ही अहवाल दिला होता. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याचा मोठा फायदा होईल. विशेषत: मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान बदलू शकते. गणपतराव देशमुख, अध्यक्ष महाराष्ट्र पाणी परिषद

पैशांपेक्षा पाणी महत्त्वाचे
पैसा किती लागतो यापेक्षा मराठवाड्यात पाणी आणणे गरजेचे आहे. त्या वेळी 8 हजार 110 कोटींचा प्रस्ताव होता. आता हा खर्च दीडपट म्हणजे 12 हजार कोटींवर लागेल. सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर पाच ते सात वर्षांत हे पाणी येऊ शकते. त्यामुळे सरकारने चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृती करावी. या. रा. जाधव, सदस्य, महाराष्ट्र पाणी परिषद

सर्वेक्षणासाठी 2 कोटी मंजूर
कोकणातले पाणी मराठवाड्यात आणण्याचा शरद पवारांचा उद्देश आहे. दोन कोटी रुपये सर्वेक्षणासाठी मंजूर केले आहेत. या माध्यमातून गोदावरी खोर्‍यातली तूट भरून काढता येणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या हेतूवर शंका घेणे उचित नाही. सुनील तटकरे, जलसंपदा मंत्री