आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौक ते महावीर चौक हमरस्ता कोणाच्या अखत्यारीत? मनपा-साबांविचे एकमेकांकडे बोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - रस्त्यांवरील खड्डे दर्जेदार साहित्य वापरूनच बुजवा. तरीही खड्डे उघडे पडल्याचे दिसले तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू. प्रसंगी फौजदारी कारवाईही प्रस्तावित करू, असे तोंडी आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिले. खड्डे बुजवण्याचा अहवाल २६ सप्टेंबर रोजी सादर करा, असेही न्यायमूर्ती शंतनू केमकर, नितीन सांबरे यांनी मनपा, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागास सांगितले. दरम्यान, क्रांती चौक ते महावीर चौक रस्ता नेमका कोणाच्या अखत्यारीत आहे, या प्रश्नाचे उत्तर महापालिका, सा.बां.च्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. तेव्हा यासंदर्भात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. 
 
शहरातील रस्ते खड्ड्यांबाबत अॅड. रूपेश जैस्वाल यांनी चार वर्षांपूर्वी याचिका दाखल केली. चार दिवसांपूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मनपा वाहतूक विभागातर्फे शासनाने शपथपत्र दाखल केले. शुक्रवारच्या सुुनावणीत खड्डे बुजवण्यासाठीचे साहित्य दर्जाहीन असल्याने ते भुरभुर पावसातही वाहून जाते. मुंबईत असा प्रकार घडल्यावर तेथील खंडपीठाने सहा बड्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित केली होती. तोच पॅटर्न औरंगाबादेतही अमलात आणला जाईल, असे खंडपीठ म्हणाले. 
 
फोटो दाखवला रेल्वेस्टेशन परिसरातील कामाचा, प्रत्यक्ष होता बनेवाडीतील 
मनपानेकाही रस्ता कामांचे फोटो दिले. त्यातील एक फोटो न्यायमूर्तींनी निरखून पाहत हा कुठला आहे, असे विचारले. त्यावर तो रेल्वेस्टेशन परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. पण हा तर त्या भागातील वाटत नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटल्यावर तो बनेवाडी परिसरातील असल्याची दुरुस्ती करण्यात आली. 
 
हस्तक्षेप अर्ज दाखल 
दरम्यान, सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंटदरम्यानचा आंबेडकर चौक, जैस्वाल मंगल कार्यालय चौक आणि हर्सूल टी पॉइंट येथील भूमिगत योजनेच्या कामासंबंधी गोपाल कुलकर्णी यांच्यातर्फे अॅड. अमोल घुगे यांनी हस्तक्षेप अर्ज सादर केला. बी. आर. कन्स्ट्रक्शन यांनी काम करताच ७५ लाख रुपये घेतल्याचे त्यात म्हटले आहे. यावर २६ सप्टेंबरला सुनावणी होईल. मनपातर्फे विशेष वकील राजेंद्र देशमुख, राज्य रस्ते महामंडळातर्फे अॅड. श्रीकांत अदवंत, शासनातर्फे अॅड. अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.

छावणी रेल्वे पुलाचे अर्धवट काम 
छावणीकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या आणि औद्योगिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या रस्त्यावरील रेल्वे पुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या अर्धवट कामाबद्दल रेल्वेस नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. 
 

वर्दळीचा जालना रोड ‘बेवारस’ 
क्रांती चौक ते महावीर चौक हा प्रचंड वर्दळीचा आणि खड्ड्यांचा रस्ता कुणाच्या अखत्यारीत आहे, अशी विचारणा केली. तेव्हा मनपाने शपथपत्राद्वारे सा.बां. विभागाकडे बोट दाखवले. तर सा.बां.ने हा रस्ता मनपाकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले. सुनावणीस सा.बां.चे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. 
 
पोलिस अण्णाच्या टपरीवर 
हायकोर्ट चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस उपअधीक्षकाची नेमणूक केल्याचे सांगितल्यावर न्यायालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी, एखादी महत्त्वाची व्यक्ती येत असल्यास तेथे पोलिस असतात. ती व्यक्ती निघून जाताच ते एखाद्या अण्णाची टपरी किंवा पंचतारांकित हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांसोबत गप्पा झोडतात, असे कोर्ट म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...