आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतीचौकातील निझामकालीन जलकुंभाचा स्लॅब कोसळला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्रांती चौकातील 10 लाख लिटर क्षमतेच्या निझामकालीन पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला असून त्यामुळे शहराच्या 9 वसाहतींना होणार्‍या पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. याशिवाय जालना रोडलगतच्या टाकीच्या भिंतीलाही तडे गेले असून ती धोकादायक बनली आहे.

क्रांती चौकातील पाण्याच्या टाकीला दोन दिवसांपासून गळती लागली होती. या टाकीवरचा स्लॅबचा मोठा भाग टाकीतच कोसळला. जमिनीवर उभारण्यात आलेली ही टाकी निझामकालीन असून ती झाकण्यासाठी नंतरच्या काळात स्लॅब टाकण्यात आला होता. स्लॅब आणि टाकीची भिंत यांना जोडणार्‍या भागातही तडे गेले. ही माहिती मिळाल्यानंतर उपअभियंता आर. एन. संधा यांनी पाहणी केली.

क्रांती चौकात पाण्याच्या चार टाक्या असून त्यातील ही सर्वात जुनी आहे. याशिवाय 22 लाख लिटरची नवी टाकी व 15 लाख लिटर आणि 10 लाख लिटरची प्रत्येकी एक टाकी आहे.

ज्या टाकीचा स्लॅब कोसळला त्यावर एक हौद बांधण्यात आला होता. तो दोन महिन्यांपूर्वीच कोसळला होता. ही टाकी धोकादायक बनल्याचे त्या वेळेसच निदर्शनास आले होते, पण काहीच कार्यवाही न झाल्याने आजचा प्रकार घडला. जालना रोडलगतच्या बाजूस या टाकीची एक भिंत येते. त्यालादेखील तडे गेले असून हा भाग अधिक धोकादायक बनला आहे. याबाबत संधा म्हणाले की, ही टाकी कायम पूर्ण भरलेली नसते. त्यात पाणी आले की ते पुढे वितरित केले जाते. त्यामुळे फार धोका नाही.

दुरुस्ती आठ दिवसांत

या टाकीची आठ दिवसांत दुरुस्ती करण्यात येणार असून सध्या ताडपत्री अथवा पॉलिनेट वापरून स्लॅबला पडलेले भगदाड झाकण्यात येणार आहे. या टाकीचा संपूर्ण स्लॅब बदलायचा झाला तर 20 ते 25 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

या भागांना होतो पाणीपुरवठा

आज पडलेल्या टाकीतून सिंधी कॉलनी, भानुदासनगर, कैलासनगर, बालाजीनगर, महूनगर, रोकडा हनुमान कॉलनी, अभिनय चित्रपटगृहाच्या आसपासचा परिसर, मोंढा, मोंढा परिसर आणि अजबनगर या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो.

रसायनांमुळे स्लॅब कमकुवत

स्लॅब कोसळण्यामागची कारणे सांगताना उपअभियंता संधा म्हणाले की, टाकीतील पाण्यात क्लोरीन आणि रसायने टाकली जातात. त्यातून तयार होणार्‍या वायूमुळे स्लॅबच्या लोखंडी सळया कमकुवत होतात. त्यामुळे स्लॅब कोसळला असावा.

दोन टाक्यांची अवस्था बिकटच

शहरात मनपाच्या 52 टाक्या असून त्यापैकी विद्यापीठातील टाकीचा जिना मोडकळीला आला आहे, तर सिडकोतील टाकीचा स्लॅब गतवर्षी कोसळून टाकीतच पडला होता. या टाकीवरच एक हौद उभारण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी तो कोसळला होता.