आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा अध्यक्ष बागडेंच्या पीएने वाहतूक पोलिसाला केली मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकरण ताजे असतानाच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या स्वीय सहायकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (२७ सप्टेंबर) घडला. या प्रकरणी तक्रार दाखल करू नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याचा आरोप पोलिसाने केला आहे. प्रमोद देशमुख असे या स्वीय सहायकाचे नाव आहे.
क्रांती चौक येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हेल्मेट सक्ती नियमाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिस रोहिदास राठोड (३२) यांनी उस्मानपुरा येथून बुलेटवर (एमएच२० बीझेड ९९५४) आलेल्या देशमुखला अडवले. तेव्हा देशमुखने त्यांना तुला माहिती नाही का आम्ही कोण आहोत ते अशी विचारणा केली. राठोडने तुम्ही कोणीही असला तरी कायद्याचे पालन करावेच लागेल, असे बजावताच देशमुखने मी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा पीए असल्याचे सांिगतले. तरीही राठोड यांनी पावती लिहिणे सुरूच ठेवला तेव्हा देशमुख व त्याच्यासोबतच्या तरुणाने राठोड यांच्यावर थेट हल्ला केला. राठोड यांच्यासोबतचे कर्मचारी मदतीला धावले. तेथे लोकही जमा झाले.
मी दंड भरतो, त्याला सोडून दे : दरम्यान, देशमुखने वाहतूक पोलिस शाखेचे सहायक पोलिस आयुक्त चंपालाल शेवगण यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा दुचाकीस्वारांना सोडण्याचे आदेश त्यांनी दिले. सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी तर मला कॉल करुन, त्याला आधी सोड. त्याचा दंड मी भरतो, असे म्हटले. त्यामुळे त्याला सोडून दिल्याचे राठोड यांनी सांगितले. या प्रकारानंतर मी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जात असताना वरिष्ठांनी इतर अधिकाऱ्यांना त्याच्यावर लक्ष ठेवत तक्रार न दाखल करण्याचे आदेश दिला. मग पोलिस वाहनात बसवून पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले. शेवगण यांच्या दालनात पुन्हा तुझा कसूरी रिपोर्ट मागवून तुला निलंबित करू, असे धमकावण्यात आले, असा आरोप राठोड यांनी केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या राठोड यांचा श्वास कोंडला गेला. तेव्हा त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांना घरी पाठवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता मी दुचाकीवर मागे बसलो होतो. चालकाचा राठोडशी वाद झाला. मी बागडे यांचा पीए असल्याचे लक्षात आल्यावर प्रकरणाला वेगळे वळण देण्यात आले, असा दावा केला.
^राठोड यांच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. उलट छातीत दुखत असल्याने आम्हीच त्यांना दवाखान्यात दाखल होण्यास सांगितले. दुचाकीस्वारावर कारवाई करत त्याची दुचाकी जप्त केली होती. तरीही राठोड यांना आक्षेप असेल तर प्रकरणाची चौकशी केली जाईल.
- चंपालाल शेवगण, सहायक पोलिस आयुक्त
दंड भरतो, सोडून द्या
काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसाला फोन करून दंड आम्ही भरतो, विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहायकाला तत्काळ सोडून दे म्हणून आणि मारहाणीची तक्रार करू नको म्हणून दबाव आणल्याचा आरोप आहे.
बातम्या आणखी आहेत...