आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस मालकाला पोलिसांची मारहाण, पत्रकार आणि आमदारांसमोर आईने मांडले गा-हाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चौकशीसाठी बोलावलेल्या खासगी बस मालकाला क्रांती चौक पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सज्जनसिंग नाऱ्हेडा यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप बस मालकाच्या आईने केला आहे. पोलिसांनी मुलालाही भेटू न दिल्यामुळे आईला अश्रू आवरले नाहीत. तिने हा सर्व प्रकार ठाण्यात आलेल्या पत्रकारांसह आमदार इम्तियाज जलील यांना सांगितल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली.

या वेळी पत्रकार आणि आमदार इम्तियाज जलील यांच्याशी बोलताना विनय गोकुळ ढाके (वय २४, रा. सिडको एन-५) आणि त्यांची आई सुनंदा ढाके यांनी सांगितले की, मध्यवर्ती बसस्थानक भागात विनय याचा भावना ट्रॅव्हल्स या नावाने व्यवसाय आहे. औरंगाबाद -पुणे या मार्गावर त्यांची बस चालते. रविवारी (ता. ८ फेब्रुवारी) पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये दोन प्रवासी बसले. मद्यधुंद अवस्थेतील या प्रवाशांनी गाडीत उलट्या करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांनी मागे बसा किंवा दुसऱ्या गाडीने प्रवास करा, असा सल्ला दिला. ते ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे त्यांना बसबाहेर काढण्यात आले. या प्रवाशांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात ट्रॅव्हल्स मालकांच्या विरोधात तक्रार दिली. तेव्हापासून पोलिस माझ्या मुलाला फोन करून पैशाची मागणी करतात. त्याला शिव्या देतात. आज तो पोलिसांना भेटायला गेला तेव्हा नाऱ्हेडा यांनी त्याला बेदम मारहाण केली. ते प्रवासी पोलिसांचे नातेवाईक होते, असा आरोपही विनयच्या आईने केला आहे.
मारहाण केली नाही
मध्यवर्ती बसस्थानकाजवळील ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांची फसवणूक करतात. त्यांना तासन््तास बसवून ठेवतात, अशा तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई सुरू आहे. अशाच प्रकारची तक्रार विनय ढाके याच्याविरोधात आली होती. तो ठाण्यात आला होता. तेव्हा मी ड्यूटीवर होतो. त्याला बाजूच्या रूममध्ये बसण्यास सांगितले होते. दरम्यान, त्याची आई आली असता चौकशी सुरू असल्याने त्यांना भेटू दिले नाही. त्याला मी अथवा ठाण्यातील इतर कोणीही मारहाण केली नाही.
सज्जनसिंग नाऱ्हेडा, पोलिस उपनिरीक्षक