आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतिसिंह, 1947 आधीच इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केली हजारो गावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा निष्ठेने चालवला. - Divya Marathi
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा निष्ठेने चालवला.
क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव समोर येताच आठवते ते पत्रीसरकार. इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करुन ब्रिटीश सरकारला पळता भुई थोडी करणारे क्रांतीसिंह नाना पाटील यांची 3 ऑगस्टला जयंती साजरी झाली. सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र येथे 3 ऑगस्ट 1900 रोजी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 
 
सत्यशोधक चळवळीकडे कल..
क्रांतिसिंह नाना पाटील हे देशभक्त झुंजार नेते म्हणून ओळखले जातात. महात्मा जोतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा निष्ठेने चालवणारे क्रांतिसिंह यांचा सुरुवातीच्या काळात सत्यशोधक चळवळीकडे कल होता. 1916 मध्ये तत्कालिन मुलकी परीक्षा उत्तीर्ण होऊन नाना पाटील यांना तलाठ्याची नोकरी मिळाली. त्यांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. तलाठ्याची नोकरी करत असतानाही नानांचा चळवळ्या स्वभाव त्यांना शांत बसू देत नव्हता. समाजातील अनिष्ठ चालीरीती त्यांना अस्वस्थ करत. अंधश्रद्धा, हुंडा, अस्पृष्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी गावागावातून दौरे करुन याविरुद्ध बंड पुकारले.

महात्मा गांधीच्या असहकार आंदोलनात
समाजात जनजागृती करत असताना 1930 मध्ये नाना पाटीलांनी महात्मा गांधीच्या असहकार चळवळीत सहभाग घेतला. त्यानंतर ते काँग्रेसमध्येही गेले. महाराष्ट्र काँग्रेस समितीवरही ते निवडून आले होते. 1942 च्या 'चले जाव चळवळीत' ते सक्रीय सहभागी होते. त्यांनी त्यावेळी भूमिगत राहून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. 1942 पर्यंत त्यांना अनेकदा तुरुंगवास झाला होता. मात्र त्यानंतर त्यांनी भूमिगत राहून दीड हजार गावांना 1947 आधीच इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले होते.

पत्रीसरकारची इंग्रजांना दहशत
छोडो भारत आंदोलनात भूमिगत झाल्यानंतर नाना पाटील यांनी काही सहकार्‍यांच्या मदतीने सातार जिल्ह्यात इंग्रजांच्या विरोधात प्रतिसरकार स्थापन केले. पोलिस स्टेशन, पोस्ट, सरकारी बँका यावर त्यांनी हल्ला केला. ब्रिटीश शासनाची व्यवस्था बंद पाडून त्यांनी स्वतःची स्वतंत्र व्यवस्था उभी केली. त्यांच्या या कार्यक्षेत्रात जर एखाद्या सरकारी व्यक्तीने सारा वसूल केला, इंग्रजांसाठी हेरगिरी केली, तर त्यांना बेदम मार दिला जात होतो. सर्व सामान्यांचा छळ करणार्‍या पाटील-तलाठ्यांना तर कोठोर शिक्षा हे प्रतिसरकार करत होते. असेही सांगितले जाते, की ते त्यांच्या पायावर पत्रे ठोकत. यामुळे त्यांच्या सरकारला पत्रीसरकार देखील म्हटले जात होते. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी रोख बक्षीस जाहीर केले होते.

ग्रामराज्याची स्थापना
प्रतिसरकारच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी खेड्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने काही योजना तयार केल्या होत्या. गावाचा संपूर्ण कारभार हा गावकरीच पाहातील हा त्यांचा दंडक होता. गावात तयार झालेल्या वस्तू गावातच विकल्या जातील. न्याय निवाड्यापासून अनेक कामे गाव पातळीवर सोडवले जात होते. त्यासाठी त्यांनी पंचसभा स्थापन केल्या होत्या. यातून परकीयांची सत्ता नष्ट होईल आणि ग्रामराज्य उदयास येईल अशी, त्यांची कार्यपद्धती होती.
फर्डो वक्ते आणि भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापुढे इंग्रज सरकारचे काही चालले नाही.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये सक्रीय असलेले क्रांतिसिंह स्वांतत्र्योत्तर काळात काँग्रेससोबत राहिले नाही. ते शेतकरी पक्षात गेले. सुरवातीच्या काळात सत्यशोधक चळवळीकडे आकृष्ट झालेले नाना पाटील यांनी अखेरच्या दिवसांमध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. दोन वेळा ते लोकसभेवर निवडून देखील गेले होते.
 
मराठवाड्यातून झाले होते खासदार
- क्रांतिसिंह नाना पाटील यांची कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्र असली तरी, त्यांना लोकसभेवर मराठवाड्याच्या जनतेने पाठवले. कम्युनिस्टांचा गड असलेल्या बीड जिल्ह्यातून 1957 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते.
- नाना पाटील यांचे व्यक्तिमत्व पैलवानासारखे होते. त्यांची भाषा अस्सल ग्रामीण ढंगाची होती. ते त्यांचा मुद्दा प्रभाविपणे मांडत. महात्मा गांधीचा त्यांच्यावर प्रभाव असला तरी त्यांनी सशस्त्र क्रांती केली. स्वातंत्र्यानंतरही त्यांचे आयुष्य समाजासाठीच होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचेही त्यांनी नेतृत्व केले. अशा या सच्चा देशभक्ताचे मिरजेत 6 डिसेंबर 1976 रोजी निधन झाले.
बातम्या आणखी आहेत...