आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्ण जन्माष्टमीसाठी भरले पन्नास पाळण्यांचे प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - श्रीकृष्ण जन्म सोहळ्यासाठी खास बनवण्यात आलेल्या आकर्षक पाळण्यांचे प्रदर्शन कलश मंगल कार्यालयामध्ये गुरुवारी (8 ऑगस्ट) भरवण्यात आले आहे. विविधरंगी
फुलांच्या झाडांवर मोरांसह असलेले पाळणे पाहताक्षणी सर्वांचे लक्ष वेधत आहेत. शहरातील कलावंत सचिन पटेल यांनी बनवलेले 50 पाळणे प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.

औरंगाबाद लेडीज असोसिएशनच्या किरण धूत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थापक अध्यक्षा प्रभा माछर, सरोज बगडिया, डॉ. चारुलता रोजेकर, शोभा बागला, पद्मा धूत, सुषमा शहा आणि संगीता मुथियान यांची प्रमुख उपस्थिती होती. आजपर्यंत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांपेक्षा हे प्रदर्शन वेगळे आहे. सचिन पटेल यांनी पहिल्यांदाच कलाकृतींचे प्रदर्शन भरवले आहे. विविध प्रकारचे 50 पाळणे या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. कमळपुष्पामध्ये असलेला पाळणाही वेगळेपण ठरतो. प्रत्येक पाळण्यावर बसलेला मोर आपल्याला खुणावतो. विविध पाळण्यांत सचिन यांनी वेगळेपण जपले आहे. पत्नी रक्षा तसेच आभा पटेल, अर्चना पटेल, रिता पोरवाल, अविनाश कांबळे या सर्वांच्या मदतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवारपर्यंत सुरू राहणार असून सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

प्रदर्शनात 1500 रुपयांपासून 10 हजारांपर्यंतचे पाळणे आहेत. पाळण्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो काम झाल्यावर फोल्ड करून ठेवता येते. मेटल, प्लाय, सिरॅमिक, एमसीलसोबत अ‍ॅक्रॅलिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. फुले, वेली, मोर सौंदर्यात भर घालतात.

मागणी वाढली
श्रीकृष्णासाठी गेल्या वर्षी 8 ते 10 पाळणे शहर आणि इतर गावांमध्ये वितरित केले. पाळण्याची कलात्मकता पाहून अनेकांना ते हवे होते. मात्र, मोठ्या संख्येने पाळणे बनवणे मला शक्य नव्हते. यंदा गोकुळाष्टमीच्या अगोदरपासूनच पाळणे बनवले आणि प्रदर्शनातून त्याची विक्री करत आहे. सचिन पटेल, कलावंत

अनोखे प्रदर्शन
प्रदर्शनामध्ये पाळण्यांबरोबर मंदिरे, चौरंग यांचाही समावेश आहे. आम्ही सर्वांनी हस्तकौशल्याच्या वापरातून या प्रदर्शनाची शोभा वाढवली आहे. दोन दिवस चालणा-या या प्रदर्शनात शहरवासीयांना कलात्मकतेचा आविष्कार पाहण्याची संधी आहे. रक्षा पटेल, कलावंत