आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात कुबेराचे मंदिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुबेराला देवांचा खजीनदार म्हटले जाते. अशा या कुबेराची देशभरात फक्त दोनच मंदिरे आहेत. पहिले गुजरातमध्ये, तर दुसरे आपल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आहे. शहराला खेटूनच असलेल्या पळशी रस्त्यावर पारदेश्वर महादेव मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी कुबेराचे सुंदर मंदिर आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुबेराचे दर्शन घेणे लाभदायक समजले जाते. त्यामुळे या दिवशी या मंदिरात मोठी गर्दी होते. तीन दिवस उत्सवही साजरा केला जातो.

कुबेराचे खूप महत्त्व असून साक्षात तिरुपती बालाजींनी विवाहासाठी त्याच्याकडूनच कर्ज घेतल्याची आख्यायिका आहे. असा हा कुबेर शिवाचा परमभक्त आहे. तो लंकाधिपती रावणाचा भाऊ असल्याचेही दाखले पुराणात आहेत. कुबेर मुळात यक्ष व राक्षस कुळातला, पण महादेवाने प्रसन्न होऊन त्याला सोन्याची लंका दिली. ती रावणाने कुबेराला मागितली आणि त्यानेही ती तत्काळ दान देऊन टाकली. महादेवांना हे कळताच ते कुबेराला म्हणाले, ‘अरे तू माझ्यासारखाच आहेस. तुला आता मी देवांचा खजीनदार करणार आहे.’ त्याप्रमाणे कुबेर देवांच्या कोशागाराचा प्रमुख झाला.

वेरूळच्या काही लेण्यांमध्ये यक्षांची शिल्पे आहेत. त्यांना पंख असल्याने ते आकाशात उडू शकत होते. वेरूळमध्ये विद्याधर नावाच्या यक्षाचे वास्तव्य होते, असा पुराणात उल्लेख आढळतो. त्याची प्रचिती आल्याने मी हे मंदिर बांधले. लक्ष्मीपूजनाचा दिवस हा पर्वकाल समजला जातो.त्या दिवशी कुबेराचे दर्शन घेतल्याने लक्ष्मीची कृपा होते.
आनंदशास्त्री गिरी, प्रमुख, पारदेश्वर मंदिर


पारदेश्वराच्या सान्निध्यात : लक्ष्मीने कुबेराला आपला पुत्र मानल्याने लक्ष्मीपूजनाला त्याच्या दर्शनाचेही विषेश महत्त्व आहे. गुजरातमध्ये कुबेराचे प्राचीन मंदिर आहे. औरंगाबाद शहरात पळशी रोडवरील पारदेश्वर मंदिरात लक्ष्मी कुबेर सिद्धपीठाची स्थापना गेल्या वर्षी करण्यात आली.

लक्ष्मी कुबेर अन् चित्रलेखा : या मंदिरात लक्ष्मी, कुबेर आणि कुबेराची पत्नी चित्रलेखा यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर आनंदशास्त्री गिरी यांनी स्थापन केले आहे.

धनकुंभ घेतलेल्या मूर्ती : पारदेश्वरच्या आवारात असलेल्या या मंदिरात मध्यभागी लक्ष्मीदेवी आहे. तिने धनकुंभ हाती घेतला आहे, तर खाली कुबेर पत्नी चित्रलेखाची सुंदर मूर्ती आहे. यात कुबेराच्या उजव्या हातात धनकुंभ आहे.

कुबेराची तीन वाहने : आनंदशास्त्री यांनी सांगितले की, जमिनीवरच्या धनाची माहिती मुंगूस देतो, पाण्यातल्या धनाची मासा, तर आकाशातल्या धनाची माहिती पांढरा अश्व देतो. ही तिन्ही कुबेराची वाहने म्हणून ओळखली जातात.