आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई मास कॉपी प्रकरण: प्रोटोकॉल तोडून कुलगुरू भेटले पोलिस आयुक्तांना; प्रत्येक व्यक्ती दोषी नाही- यादव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कोणत्याही विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे राज्यपालांचे प्रतिनिधी. ते अगदी विभागीय आयुक्तांनाही एखाद्या प्रकरणासाठी भेटण्याकरिता बोलावू शकतात. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यास काही माहिती हवी असल्यास त्यानेच कुलगुरूंना जाऊन भेटावे, असा राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रोटोकॉल सोमवारी दुपारी तोडला. साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील मास कॉपीप्रकरणी त्यांनी पोलिस आयुक्तालयात जाऊन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे ते म्हणाले, तर पोलिस आयुक्तालयात येणारी प्रत्येक व्यक्ती दोषी नसते. काही जण पोलिसांना मदत करण्यासाठीही येतात, असे यादव म्हणाले. 

सहा दिवसांपूर्वी चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी रात्री दोनच्या सुमारास सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर सोडवत होते. त्याच वेळी गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या प्रकारात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कार्यपद्धतीत त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. त्यामुळे कुलगुरूंचाही जबाब नोंदवला जाऊ शकतो, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

मी त्यांच्याकडे गेलो असतो, पण तेच आले 
कुलगुरू हे पद खूप मोठे असल्याने त्यांची चौकशी किंवा जबाब नोंदवण्याचा प्रश्नच नाही. मी त्यांच्याकडे गेलो असतो, मात्र तेच आले. कॉपी प्रकरणात कुलगुरूंच्या आदेशाने स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल ते पोलिसांना देतील. तो कधी मिळेल, याची अचूक माहिती नाही. त्या अहवालात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच. अहवालाशिवाय जे दोषी वाटतील त्यांचाही जबाब नोंदवू. 

दरम्यान, कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव समितीतर्फे २३ मे रोजी दुपारी चार वाजता सुभेदारीवर बैठक होणार आहे. 

आणखी वीस विद्यार्थी रडारवर 
१६ मे रोजी सुरेंच्या घरातून ४७ उत्तरपत्रिका जप्त केल्या होत्या. तेथे २७ विद्यार्थी होते. (एक विद्यार्थिनी परीक्षेशी संबंधित नव्हती.) त्यामुळे उर्वरित वीस विद्यार्थ्यांची नावे बारकोड डिकोड करून काढली जातील आणि त्यांचीही चौकशी करण्यात येईल, असे यादव म्हणाले. 

सदिच्छा : तपास अधिकाऱ्यांसोबत...
दीडच्या सुमारास कुलगुरू पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या गाडीने आयुक्तालयात आले. यादव यांच्या दालनात अर्धा तास चर्चा केली. ही सदिच्छा भेट असली तरी मास कॉपी प्रकरणातील तपास अधिकारीही दालनात होते. 

तत्काळची व्याख्या मागवू... 
होमसेंटर असताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तत्काळ विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पोहोचवणे आवश्यक आहे. मात्र, तत्काळ या शब्दाच्या व्याख्येत स्पष्टता नाही. ती आम्ही विद्यापीठाकडून मागवू. 

जे काही केले ते विद्यापीठ हितासाठी; कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचे स्पष्टीकरण 
विद्यापीठाने ‘मास कॉपी’संदर्भात काय कारवाई केली, याची माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्तांची सदिच्छा भेट घेतली. यापूर्वीच त्यांची वेळ मागितली होती. मात्र, ते व्यग्र होते. सोमवारी सकाळी फोन केल्यावर त्यांनी दुपारी दीड वाजेची वेळ दिली. त्यानुसार अगदी दहा मिनिटे त्यांना भेटलो. तपासात विद्यापीठ पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांना दिले. प्रोटोकॉलचा प्रश्नच नाही. जे काही केले ते विद्यापीठ हितासाठीच. 

प्राचार्य म्हणाले, तत्काळ म्हणजे त्याच दिवशी; पण...
देवगिरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, आयसीएम अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. दिलीप गौर म्हणाले की, विद्यापीठाची गाडी आली नाही तरी आम्ही त्याच दिवशी स्वत: उत्तरपत्रिका परीक्षा विभागात जमा करतो. त्यामुळे तत्काळ म्हणजे त्याच दिवशी. तरीही तत्काळची व्याख्या स्पष्ट नाही. 

हे केले... 
परीक्षामूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी. एम. नेटके यांचा पदभार काढला. परीक्षा विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, प्राचार्य, सहभागी प्राध्यापकांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ केले. साईचे होम सेंटर रद्द केले. 

हे करणार 
साईचे संलग्नीकरण रद्द करणार. तेथे पहिल्या दिवसापासून झालेले सर्व पेपर (मास कॉपी) आहे का याची तपासणी करणार. 

पण हे केलेच नाही 
दरम्यान,घटनेला सहा दिवस उलटून गेले तरी साईचे संलग्नीकरण रद्द करण्यासाठी विद्यापीठाने अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. साधी कारणे दाखवा नोटीसही पाठवलेली नाही. संलग्नता समिती पाठवू. तिचा अहवाल आल्यावर सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेऊ, असे कुलगुरू म्हणाले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा,
मुलींवरील बडतर्फीची कारवाई रद्द करावी; साई कारवाई प्रकरणी वडिलांची कुलगुरूंकडे मागणी 
बातम्या आणखी आहेत...