आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणला कुंभमेळा घेण्यासाठी पालकमंत्र्यांना घातले साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पैठण येथे येत्या १४ जुलै ते २५ सप्टेंबरदरम्यान "सिंहस्थ कुंभमेळा २०१५' घेण्यात यावा, यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांना काही संस्था, संघटनांनी साकडे घातले आहे. या कुंभमेळ्यामुळे पैठण ते आपेगावदरम्यान असलेला गोदापात्र परिसर स्वच्छ होईल. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रारूप आराखड्याची अंमलबजावणी केल्यास पैठण शहर, परिसराचा नक्कीच कायापालट होईल. त्यासाठी ३३८ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी लागणार आहे, असेही त्यांचे म्हणणे त्यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार यासंदर्भात गुरुवारी (७ मे) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे.

पैठण ही साधू-संतांच्या पदस्पर्शाने आणि जन्माने पावन झालेली भूमी आहे. याच भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज यांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे या थोर संतांच्या भूमीत "सिंहस्थ कुंभमेळा २०१५' हा १४ जुलै ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रतिष्ठान नगरीत (पैठण) घेण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे अप्पासाहेब निर्मळ, अखिल भारतीय कुंभमेळा आखाडा परिषदेचे अध्यक्ष बळीराम महाराज जाेगस, कृष्णा महाराज नवले पैठणचे नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या कुंभमेळ्याचा प्रारूप आराखडाही त्यांना देण्यात आला आहे. यासाठी आमदार संदिपान भुमरे, खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुढाकार घेतला.

कशी आहे सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा‌? :वेदकाळापासून पैठण येथे सिंहस्थ शाहीस्नान पर्वाची परंपरा सुरू आहे. याचा संदर्भ कृष्णादयानंद (विजय ग्रंथात) आहे. दुसर्‍या शतकामध्ये सातवाहन सम्राट राजाने सर्व साधू-संतांना बोलावून दुधाने पहिले शाही स्नान घातले होते. पुढे ही परंपरा सातवाहन राजाचे शिष्य श्री चक्रेश्वर यांनी पुन्हा दुधाने शाही स्नान सुरू ठेवले. त्यानंतर शालिवाहन राजाने पैठण येथे कृष्णकमळ तीर्थाजवळ शाही स्नानाचे आयोजन केले होते. सिंहस्थ शाही स्नानाची पहिली सभा ब्रह्मचारी दंडास्वामी यांनी १००० मध्ये भरवली होती. श्री संत चक्रधर स्वामी हे सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने पैठणला १२ व्या शतकात आले होते. त्यांनी पिंपळेश्वर घाट येथे ही परंपरा सुरू ठेवली. तसेच संत एकनाथ महाराज यांनी साधू-संतांना घेऊन शाही स्नानाची परंपरा कायम ठेवली. गागाभट्ट यांनी विद्वान पंडित सिंहस्थ शाही स्नानाकरिता पैठण येथे आणले होते. तसेच संत कृष्णदयार्णव महाराज यांनी १९१७ मध्ये सिंहस्थ शाही स्नानाचे पर्व आयोजित केले होते, तर १९३८ मध्ये सरकारचे प्रतिनिधी कमाल अली यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले होते.

शासनाकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन
पैठणला मोठ्या प्रमाणात कुंभमेळा भरवण्याने आपल्या भागाचा विकासच होईल. तसेच त्यानिमित्ताने पैठण ते आपेगाव गोदापात्र स्वच्छ होईल. त्याचा फायदा भाविकांना होईल. या कामासाठी आमदार संदीपान भुमरे यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. अप्पासाहेबनिर्मळ, अध्यक्ष, जायकवाडी पाणी संघर्ष कृती समिती.

या ठिकाणी करता येईल भाविकांना शाही स्नान
पैठण येथे सिंहस्थ कुंभमेळा घेतल, तर १४ जुलै रोजी मोक्ष घाट येथे सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ, सुरुवातीला सकाळी ते दुपारी वाजेदरम्यान ध्वजारोहण धार्मिक कार्यक्रम होतील. पहिले शाही स्नान २९ ऑगस्ट रोजी मिरवणुकीने होईल, दुसरे शाही स्नान १३ सप्टेंबर रोजी, तर तिसरे शाही स्नान २५ सप्टेंबर रोजी होईल; परंतु हे तिन्ही शाही स्नान नागघाट, रंगारहट्टी, गणेश घाट, मोक्ष घाट, नाथ घाट, गाढेश्वर, पिंपळेश्वर तीर्थावली या ठिकाणी होतील.

कुंभमेळ्याच्या पूर्वीच ही करावी लागतील कामे
गोदावरी पात्राच्या स्वच्छतेसाठी ५५ कोटी रुपये लागतील. याशिवाय साधू-संत,महाराजांना मूलभूत सोयी-सुविधा, मिरवणूक मार्गाचे डांबरीकरण, फिरते दवाखाने रुग्णवाहिका, पोलिस चौक्या तयार करणे यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये लागतील. नाशिकच्या कुंभमेळ्यास सरकार साडेतीन हजार कोटी देते; मग पैठणला साडेतीनशे कोटी का नाही, असाही सवाल कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेणार्‍यांनी केला आहे.