आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kurla ajani Nijamabad Express Time Table Collapsed

कुर्ला-अजनी-निझामाबाद रेल्वेगाडीचे नियोजन ढेपाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कुर्ला येथून निझामाबाद व अजनी (नागपूर)कडे औरंगाबादहून जाणार्‍या दोन्ही साप्ताहिक रेल्वेंना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रेल्वेचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र, रेल्वे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे आगमनालाच अपशकून झाला आहे. नवीन लोकमान्य टिळक (कुर्ला) अजनी एक्स्प्रेस मंगळवारी (5 नाव्हेंबर) पहाटे अर्धा तास उशिरा आली. या रेल्वेच्या उद्घोषणेची ऑनलाइन व्यवस्था होत नव्हती. रेल्वेस्थानकावरील डिजिटल डिस्प्लेवर गाडीचा नंबरही येत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.

औरंगाबादमार्गे जाणारी ही एक्स्प्रेस हिंगोली, अकोला, बडनेरामार्गे अजनीला जाते. 4 नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून निघणार्‍या रेल्वेचे आरक्षण फुल झाले होते. सोमवारी सायंकाळी 3.30 वाजता कुर्ला येथून निघालेली ही गाडी (11201) मंगळवारी पहाटे 12.50 वाजता औरंगाबादला पोहोचली. औरंगाबाद स्थानकावर रेल्वेला 10 मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. प्रत्येक गाडी स्थानकावर येण्यापूर्वी ऑनलाइन उद्घोषणा केली जाते; परंतु अजनी एक्स्प्रेसच्या बाबतीत असे घडले नाही. रेल्वे कर्मचार्‍यांकडून गाडी येण्याच्या दहा मिनिटांपूर्वी ध्वनिक्षेपकावरून घोषणा केली गेली. रेल्वे अर्थसंकल्पात लोकमान्य टिळक टर्मिनस अजनी (नागपूर) एक्स्प्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस निझामाबाद एक्स्प्रेस व चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसची घोषणा करण्यात आली होती. यापैकी अजनी व निझामाबाद एक्स्प्रेसला मुहूर्त मिळाला आहे. लोकमान्य टिळक अजनी एक्स्प्रेस (11201) कुर्ला येथून प्रत्येक सोमवारी दुपारी 3.30 वाजता निघेल. उपरोक्त रेल्वे औरंगाबादला पहाटे 12.20 वाजता पोहोचेल व 12.30 वाजता निघून अजनी येथे मंगळवारी दुपारी 2.15 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्र. 11202 अजनी येथून प्रत्येक शुक्रवारी दुपारी 4.15 वाजता निघून औरंगाबादला शनिवारी सकाळी 6.25 वाजता पोहोचते. रेल्वेचा मार्ग ठाणे, कल्याण, इगतपुरी, देवळाली, नाशिक रोड, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा असा राहील. रेल्वेला टू एसी एक, थ्री एसी तीन, स्लीपर क्लास 6, साधारण सहा डबे राहतील. दोन डबे गार्ड, लगेज व ब्रेक व्हॅनसाठी राहतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस निझामाबाद एक्स्प्रेस (11205) प्रत्येक शनिवारी दुपारी 4.40 वाजता कुर्ला येथून निघून औरंगाबादला मध्यरात्री 12.20 वाजता पोहोचेल व निझामाबाद येथे रविवारी सकाळी 9.15 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी (11206) निझामाबाद येथून रविवारी रात्री 11.15 वाजता निघून, औरंगाबादला सोमवारी सकाळी 6.25 वाजता पोहोचेल. औरंगाबादहून सकाळी 6.30 वाजता निघालेली गाडी कुर्ला येथे दुपारी 1.55 वाजता पोहोचते. रेल्वेला एक टू एसी, तीन थ्री एसी, सहा स्लीपर, सहा साधारण डबे राहतील. ही गाडी कल्याण, इगतपुरी, देवळाली, नाशिक रोड, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर येथे थांबेल. दोन्ही गाड्यांचे आरक्षण शनिवार 26 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे.

अजनी आली अन् गेली, तरीही माहिती मात्र नंदीग्रामची!

अजनी एक्स्प्रेसपूर्वी मुंबई-नागपूर ही नंदीग्राम एक्स्प्रेस (11401) स्थानकावर येऊन गेली तरीही तिच्याच डब्यांची स्थिती डिस्प्ले बोर्डवर दाखवली जात होती. त्यानंतर अजनी एक्स्प्रेस आली आणि गेली. तरीही नंदीग्रामचा गाडी क्रमांक व डब्यांची स्थिती दर्शवली जात होती. ऐन वेळी आलेले प्रवासी यामुळे भांबावून गेले. अजनी एक्स्प्रेस स्थानकामध्ये उभी असतानाही डिस्प्ले बोर्डवर मात्र नंदीग्रामचीच माहिती झळकत होती.