आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kuwait Princess Shaikh Alia News In Marathi, Aurangabad, Acupuncture

कुवेतची राजकुमारी आली औरंगाबादेत अँक्युपंक्चर शिकण्‍यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कुवेतमधील कायदा कडक असल्याने महिला सुरक्षित आणि स्वतंत्र आहेत. पूर्वी तलाक तीन वेळा म्हटले की घटस्फोट व्हायचा, पण आता परिस्थिती बदलली आहे. महिला कमावणारी असली, तरी तिला घटस्फोट झाल्यावर पतीला तिच्या उदरनिर्वाहासाठी पैसे द्यावे लागतात. त्यामुळे घटस्फोट घेणार्‍यांना चांगलीच चपराक बसली असल्याचे कुवेतच्या राजकुमारी शेख आलिया सलीम अल सबाह यांनी सांगितले.


शहरातील डॉ. पु. भ. लोहिया यांच्याकडे त्या अँक्युपंक्चर उपचार पद्धती शिकण्यासाठी आल्या आहेत. दै. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी चर्चा करून कुवेतमधील महिलांचे सामाजिक प्रश्न आणि त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेतले. शेख आलिया म्हणाल्या, कुवेतमध्ये महिलांच्या उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे. संसदेत महिला असल्याने महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे त्यांनी केले आहेत. मुलींचा जन्म आमच्याकडे नाकारला जात नाही. तसेच सुरक्षिततेला कुटुंब आणि शासकीय पातळीवर विशेष महत्त्व दिले जाते. कडक शिक्षेची तरतूद असल्याने अत्याचारांचे प्रमाण नगण्य आहे. स्वत:बद्दल सांगताना त्या म्हणाल्या, एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी अमेरिकेत पूर्ण केली. तिथेच विवाहबद्ध झाले. मेडिकलला जाण्याचा माझा कल होता, परंतु ग्रीन कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. विवाहानंतर पतीकडे माझी इच्छा बोलून दाखविली. तेव्हा कुवेतमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मला प्रेरणा दिल्याचे त्यांनी सांगितले.


शेख आलिया यांचे पती सध्या कुवेतमध्ये गृहमंत्री आहेत. लग्नानंतर त्यांनी अँलोपॅथीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोलकात्याला पोस्टल वैद्यकीय प्रशिक्षण घेतल्यावर रशियामध्ये ओझोन थेरपीचा कोर्स पूर्ण केला. याचदरम्यान चायनीज अँक्युपंक्चर उपचार पद्धतीबाबत कळाले. त्यासाठी चीनमध्येही गेले. भाषेचा अडसर यामुळे मला समाधान वाटत नव्हते. तेव्हा भारतातील डॉ. लोहियांबद्दल कळाले. त्यांचा शोध घेत मी औरंगाबादेत आले. हैदराबादेत पुढील आठवड्यांत ते अँक्युप्रेशरचे शिबिर घेणार आहे, त्यात मीही सहभागी होणार आहे. या थेरपीचा साइड इफ्केट नसल्याने आजार पूर्णपणे मात करता येते, याचा मी अनुभव घेतला आहे. कुवेतमध्ये जाऊन अँक्युप्रेशर सेंटर सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.