आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अल निनो’मुळे रब्बीचे उत्पादन ५०% घटणार, आंब्यालाही बसणार झळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदाचा खरीप गिळंकृत करणारा अल निनो आता रब्बीच्याही जिवावर उठला आहे. विषुववृत्ताजवळ प्रशांत महासागरात सध्या अल निनो तीव्र स्वरूपात आहे. त्यामुळे प्रशांत महासागरासह भारतीय उपखंडातील महासागरांतील पाण्याचे तापमान वाढलेले आहे. परिणामी भारतीय उपखंडातून थंडी सौम्य झाली आहे. त्यामुळे रब्बीतील पिकांचे उत्पादन ४० ते ५० टक्के घटण्याचा अंदाज हवामान व कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या संदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, हवामानाच्या बाबतीत २०१५ हे वर्षच वेगळे आहे. अल निनोमुळे पाऊस अपुरा झाला. थंडीचा कालावधी कमी झाल्याने गव्हाच्या उत्पादकतेवर (प्रतिहेक्टरी उत्पादन) मोठा परिणाम होणार आहे. अजूनही अल निनो सक्रिय असल्याने रब्बीवर परिणाम जाणवणार आहे.

जानेवारीत थंडी परतणार
नांदेड येथील एमजीएम खगोल व अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, जानेवारीत अल निनो सौम्य होऊन थंडी वाढणार आहे. उत्तर गोलार्धातील ग्लोबल वाॅर्मिंगमुळेही आता तापमान वाढले आहे.
उत्पादन ४० ते ५० टक्के घटणार
अपुरा पाऊस, कमी थंडी आणि पाण्याची कमतरता यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन ४० ते ५० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. कमी थंडीचा फटका मुख्यत: गहू, हरभरा पिकाला जास्त बसण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी या पिकांच्या संवेदनशील अवस्थेत (फुलोरा येण्यापूर्वी व दाणे भरतेवेळी) तुषार सिंचनाने पाणी द्यावे. कोरडवाहू पिकांसाठी एक टक्का पोटॅशियम नायट्रेट (१०० ग्रॅम १० लिटर पाण्यात) किंवा २ टक्के युरियाची (२०० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात) फवारणी करावी.'
डॉ. एस.बी. पवार, प्रमुख, व.ना. म. कृ. वि. कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद

आंब्यालाही बसणार झळ
यंदा अद्याप कडक थंडी पडलेली नाही. राज्यातील काही जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला तेथे आंब्याला पालवी फुटली आहे. काही ठिकाणी मात्र फुलोऱ्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश ठिकाणी फुलोरा उशिरा येईल. एकूणच बदलत्या हवामानामुळे यंदा आंबा पिकाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.'
- डॉ. भगवानराव कापसे, फळबाग तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...