आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल निनोची बहीण ला निनाकडून यंदा धो धो पावसाचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सलग तीन वर्षे दुष्काळास कारणीभूत ठरलेला अल निनो २०१६ मध्ये निरोप घेण्याची शक्यता आहे. त्याची जागा आता त्याची बहीण समजली जाणारी "ला निनो' घेणार आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि युरोपातील हवामान विभागाच्या निरीक्षणांतून ही बाब समोर आली आहे. भारतीय हवामान खात्यानेही ला निनाच्या शक्यतेला दुजोरा दिला. यामुळे आशियासह भारतीय उपखंडात २०१६ मध्ये चांगल्या पावसाची शक्यता वाढली आहे.

जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या देशांतील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत नोंदवलेल्या निरीक्षणानुसार २०१५ मध्ये अल निनोचा प्रभाव अत्यंत तीव्र स्वरूपात आढळून आला. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अल निनो अत्यंत तीव्र अवस्थेतून सामान्य स्थितीत परिवर्तित होत असल्याचे संकेत शास्त्रीय अभ्यासातून मिळाले आहेत. अल निनोमुळे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान यंदा चांगलेच वाढले. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान अल निनो आणखी सौम्य होईल व ला निनाचे अस्तित्व स्पष्टपणे सांगता येईल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले.

अल निनो-ला निना
अल निनो किंवा ला निना या प्रणाली नाताळच्या आसपास महासागरात अस्तित्व दाखवतात. अल निनो हा मूळ स्पॅनिश शब्द. याचा अर्थ छोटे बाळ, तर ला निना म्हणजे छोटी मुलगी. त्यामुळे ला निनाला अल निनोची बहीण (सिस्टर क्लायमेट फिनॉमेनन ऑफ अल निनो) संबोधतात. अल निनोमुळे तापमान वाढते, तर ला निनामुळे सामान्य वा थंड राहते.
ला निना भारतासाठी उपयुक्त : ला निना भारतीय उपखंडातील पर्जन्यमानासाठी अनुकूल मानली जाते. ला निनाचे अस्तित्व असलेल्या वर्षांत भारतात चांगला पाऊस पडतो, असा आजवरचा अनुभव आहे.

ला निनाचे चांगले संकेत
> ला निनाबाबत भाकीत घाईचे ठरेल. निरीक्षणानुसार सध्या तशी परिस्थिती आहे. सध्या ला निनाची शक्यता २०% आहे. याबाबत दीर्घकालीन निरीक्षणाची आवश्यकता असते. जानेवारी -फेब्रुवारीमध्ये अल निनो सौम्य होईल, त्यानंतर या बाबत आणखी ठामपणे भाकीत करणे सुलभ राहील.
-डॉ. डी. एस. पै, शास्त्रज्ञ, क्लायमेट सर्व्हिसेस, भारतीय हवामान खाते, पुणे
बातम्या आणखी आहेत...