आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबर कॉलनीवर बुलडोझर चालवण्याच्या हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शासकीय अधिकारी अन् कर्मचा-यांसाठी 1970 च्या दशकात बांधण्यात आलेली निवासस्थाने पुढे त्यांच्या नातेवाइकांनी बळकावल्यामुळे जिल्हाधिका-यांच्या शासकीय निवासस्थानासमोरील लेबर कॉलनीचा मुद्दा गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत आहे. ही जागा आमचीच असल्याचा दावा रहिवाशांकडून करण्यात येतो, तर तेथील विद्यमान मालमत्ता पाडून नवीन अपार्टमेंट उभारण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.
विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत या कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असून तेथे नव्याने बांधकाम करण्यात यावे, असे 2008 मध्ये ठरले होते. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी तसे आदेशही दिले होते. त्यानुसार येथील मालमत्तांचा पाणीपुरवठा तोडण्याचेही ठरले होते. मात्र, येथील रहिवासी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे धाव घेत स्थगिती मिळवली. ही स्थगिती किती दिवसांसाठी होती, याचा लेखी पुरावा कोणाकडेही नाही. त्यामुळे प्रकरण गेली सहा वर्षे तसेच पडून होते. जयस्वाल यांनी लेबर कॉलनीतील सुमारे दीड एकर जागा मोकळी करून तेथे नवीन इमारत उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.

डागडुजी करून राहतात नागरिक
जागा शासनाची असल्याने नवीन बांधकाम होत नाही. फार फार तर रंगरंगोटी केली जाते. त्यामुळे जुन्या इमारतीची डागडुजी करून नागरिक येथे राहतात. काही जण तर खासगी सेवेत असताना या कॉलनीत राहतात. काहींनी विद्युत बिल स्वत:च्या नावे करून घेतले असून काहींचे बिल आजही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे येते. पाणीपट्टीही बांधकाम विभागाच्याच नावे येते. त्यामुळेच त्यांनी येथील पाणीपुरवठा थांबवावा, असे पत्र वारंवार पालिकेला दिले आहे. मात्र, काही फरक पडला नाही.

आंदोलन करू

ही जागा शासनाच्या मालकीची नाहीच. ती एका नवाबाच्या मालकीची आहे. त्यामुळे 2008 मध्ये विलासराव देशमुख यांनी प्रक्रिया स्थगित केली होती. त्यासाठी कॅबिनेटची विशेष बैठक बोलावली होती. आम्ही याविरोधात आंदोलन करू.
चंद्रभान पारखे, काँग्रेस नेते तथा रहिवासी.