आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो रुग्णांच्या तपासणीसाठी केवळ एकाच डॉक्टरचे पथक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणा-या बजाजनगरात नुकतेच डेंग्यूसदृश आजाराचे दोन बळी गेले. आता तरी संबंधितांना जाग येईल, अशी रहिवाशांची अपेक्षा होती. मात्र, आरोग्य विभाग अद्यापही याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. संबंधित ग्रामपंचायत व एमआयडीसी प्रशासन स्वच्छतेसाठी एक-दुस-याकडे बोट दाखवत आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभागाकडूनही वाढत्या रुग्णसंख्येबाबत गांभीर्य दाखवले जात नाही. सध्या शेकडो रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने ग्रस्त असले, तरी मंगळवारी (29 जुलै) जिल्हा हिवताप नियंत्रण कार्यालय व दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक पथक बजाजनगरात दाखल झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे या पथकात केवळ एक डॉक्टर आणि चार कर्मचा-यांचा समावेश आहे. या पथकाकडून परिसरातील रुग्णांची तपासणी करून रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले.
बजाजनगरातील जागृत हनुमान मंदिर परिसरातील रुग्णांना मंगळवारी हिवताप, मलेरिया या आजारांबाबत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी तब्बल 375 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ताप असणा-या 130 रुग्णांपैकी अधिक ताप असलेल्या 45 रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले. रुग्णसंख्या मोठी असल्याने या पथकाची भंबेरी उडाली. दरम्यान, बुधवारी (30 जुलै) खास डेंग्यू या आजाराबाबत तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बजाजनगरात दाखल होणार असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.

काय म्हणाले पथक ?
डेंग्यू हा आजार स्वच्छ पाण्यात उत्पादित डासांपासून होतो. डासांच्या अळ्यांमुळे अनेक साथींच्या रोगांची लागण होते. त्यासाठी घरात साठवण्यात येणारे पाणी उघडे ठेवू नये. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. परिसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावावी. परिसरातील डबकी बुजवावीत. छतावरील जुने टायर, नारळाची करवंटी याची विल्हेवाट लावावी. विविध आजारांविषयी सुरू केलेल्या जनजागृती अभियानात आरोग्य विभागाचे पथक सहभागी झाले होते. त्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा भंडारे, स्मिता पुराणिक, राजेंद्र गावंडे, एस. आर. शिंदे, जोशी यांचा समावेश होता.
सहकारी डॉक्टर येणार
लोकसंख्येच्या तुलनेत एका डॉक्टरने तपासणी करणे शक्य नाही. वरिष्ठांनी सहकारी डॉक्टर देण्याचे आश्वासन दिले आहे.
डॉ. रेखा भंडारी, वैद्यकीय अधिकारी