आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसटी’त संगणकीकरणाचा अभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एकीकडे सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात संगणकीकरण होत असतानाच एसटी महामंडळात मात्र जुन्याच पद्धतीने काम केले जात आहे. आरक्षण वगळता उर्वरित विभागात आजही कागदोपत्री काम चालते. परिणामी कार्यालयाचा वेळ आणि महामंडळाच्या निधीचा अपव्यय होत आहे.

कामात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व विभाग संगणकीकृत होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

संगणकीकरणाचा अभाव असल्याने महामंडळात एका कर्मचार्‍याचे काम चार जण करत आहेत. शिवाय कुठल्याही कामाचे योग्य नियोजन होत नाही. कागदोपत्री रेकॉर्ड ठेवण्याची प्रक्रियाही अत्यंत किचकट आहे. त्याचा फटका महामंडळातील कर्मचार्‍यांना बसतो. एका दिवसात होणार्‍या कार्यालयीन कामासाठी कर्मचार्‍यांना दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागते. राज्यात बसची संख्या एकूण 16 हजारांच्या घरात आहे. 35 विभागीय कार्यालये तर 6 प्रादेशिक कार्यालये आहेत. ती संगणकाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली गेली नाहीत. खासगी बसचे नियोजन असल्याने त्यांच्याकडे प्रत्येक बसमागे 4 कर्मचारी काम करतात. मात्र, महामंडळाच्या एका बसमागे 7 ते 8 कर्मचारी असल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशात महामंडळाची सर्व कार्यालये संगणकीकृत असून वाहकाने प्रवाशाचे तिकीट काढले की क्षणार्धात माहिती संबंधित कार्यालयाला मिळते. बस कुठे आहे, किती वेळेत पोहोचणार आहे यांची सर्व माहिती जीपीआरएस तंत्राद्वारे तत्काळ कळते. राज्यातील महामंडळाच्या कार्यालयात मात्र केवळ फायलीचे ढिगारे दिसतात.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे यांनी सर्व विभाग ऑनलाइन करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. राज्य शासनानेदेखील त्यांच्या प्रस्तावास हिरवा कंदील दिल्याने त्यांनी राज्यातील 6 विभागीय आणि 35 मंडळ कार्यालये एक खिडकी योजनेअंतर्गत मुख्यालयातील संगणकाशी जोडण्याचे काम सुरू केले आहे.

संगणकीकरण लवकरच
एसटी महामंडळाच्या प्रत्येक कार्यालयात संगणकीकरण करण्याच्या दृष्टीने योजना आखली जात आहे. लवकरच सर्व विभाग संगणकाने जोडण्यात येतील. विकास खारगे, एमडी, एसटी महामंडळ.