आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेच्या पर्यटन माहिती केंद्रात स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचा अभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील पर्यटन वाढविण्यासाठी महानगरपालिकेने दहा महिन्यांपूर्वी पर्यटन माहिती केंद्र सुरू केले आहे. मात्र दहा महिन्यांत मनपाने येथे पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करून दिले नाही. विशेष म्हणजे कुणी पर्यटक आल्यास त्यांच्या व्यवस्थेसाठी स्वच्छतागृहही नसल्याचे गुरुवारी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी केलेल्या पाहणीत समोर आले. विशेष म्हणजे येथे नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना वेतनच दिले नसल्याचेही या वेळी निदर्शनास आले आहे.
 
ऐतिहासिक शहराचे बिरुद लागलेल्या शहराच्या मनपाने पर्यटकांना आकर्षित करून पर्यटनाला चालना देण्यासाठी देशी-परदेशीच्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी महानगरपालिकेने २० जून २०१६ रोजी रेल्वेस्टेशन परिसरात पर्यटन केंद्राचे उद्घाटन केले होते. त्याची स्थिती वाईट झाली असून गुरुवारी घोगरे यांनी त्याची पाहणी केली. त्या वेळी केंद्रात साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे भयंकर सत्य समोर आले. त्याचबरोबर स्वच्छतागृहाचा अभाव, तुटलेले दार, अस्वच्छता अशा बाबींमुळे सुविधा होणारे केंद्र असुविधेचे होत असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दहा महिन्यांपासून निरंतर या केंद्रात सेवा देण्यासाठी विद्यापीठाच्या पर्यटन विभागामार्फत सहा विद्यार्थी नियुक्त केले. मनपाने विद्यापीठाच्या पर्यटनशास्त्र विभागाशी लेखी करार करताच विद्यार्थ्यांची नियुक्ती केली. त्यामुळे पैसे पर्यटनशास्त्र विभागाला द्यायचे की विद्यार्थ्यांना, असा प्रश्न उपस्थित करून सुरुवातीला पालिकेने वेतन दिले नव्हते. त्यांच्या वेतनाची संचिका तयार आहे, पण यांना मनपा आस्थापनावर दाखविता येणार नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून त्यांचे पगार देण्यास टाळाटाळ होत असून दहा महिन्यांत मनपाने या विद्यार्थ्यांना एक छदामही दिला नाही. त्यामुळे दोन जण काम सोडून गेले आहेत. 
 
केंद्रातील माहिती फलक अस्ताव्यस्त पडले होते. केंद्राचा एक दरवाजा निखळला आहे. केंद्राच्या मागील बाजूस प्रतीक्षालय आहे, परंतु तिथे स्वच्छतागृहाचा अभाव आहे. स्वच्छतेसाठी येथे शिपाई नाही. टेलिफोन, इंटरनेट आदी सुविधांचीही येथे वाणवा आहे. हे केंद्र रेल्वेस्थानकाजवळ असले तरी रस्त्यात ते दर्शविणारे फलक नसल्याचेही दिसून आले. आयुक्तांसोबत बैठक घेऊन हे सर्व प्रश्न सोडविणार असल्याचे उपमहापौर स्मिता घोगरे यांनी सांगितले. 
उपमहापौर स्मिता घोगरे यांनी गुरुवारी पर्यटन केंद्राची पाहणी केली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...