आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटचा अभाव, एकाची मृत्यूकडे धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाऱ्याच्यावेगाशी स्पर्धा करणारी दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची चूक करणारा तरुण उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. दुभाजकावरून रस्ता ओलांडणारी एक महिला दुचाकीवरील त्याचा मित्रही या अपघातात जखमी झाला आहे.
रविवारी सायंकाळी सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ शाहेद पठाण अहमद पठाण (१९) हा तरुण स्पोर्ट्स प्रकारच्या दुचाकीवरून भरधाव जात असताना दुचाकीचे हँडल दुभाजकात अडकले आणि तो रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. पाठीमागे बसलेल्या त्याच्या मित्रालाही दुखापत झाली असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेलाही धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

चिकलठाणा परिसरातील ग्रामीण पोलिस ठाण्यामागे राहणाऱ्या शाहेद पठाण त्याचा मित्र शेख आसिफ शेख मंजूर (१९) हे दोघे यामाहा आर-१५ (एमएच २० डीयू ००४५) दुचाकीवर शहरात फिरण्यासाठी निघाले. पैठण गेट परिसरात चहा घेतल्यानंतर ते भरधाव घराकडे निघाले होते. सेव्हन हिल्स उड्डाणपूल सुरू होतो तेथेच शाहेदचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. वेग जास्त असल्याने दुचाकी त्याला आवरली गेली नाही. त्याने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिली दुचाकी दुभाजकात अडकली. यानंतर शेख आसिफ मागे फेकला गेला आणि शाहेद रस्त्यावर आपटला. हेल्मेट घातलेले नसल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता.

वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पुरी जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शशिकांत तायडे, पोलिस हवालदार एस. के. झरे, कावरे, जाधव या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शाहेद शेख आसिफला घाटीत दाखल केले. रात्री उशिरापर्यंत शाहेदवर उपचार सुरू होते. जिन्सी पोलिस ठाण्यात नोंद करून तपास हवालदार शेख शकील करत आहेत.

शाॅर्टकट शोधणारे धोकादायक
उड्डाणपुलांसह जालना रोडवर असलेल्या दुभाजकावरून रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ठिकठिकाणी तुटलेले दुभाजक शाॅर्टकट शोधणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध करून देत असून त्यावर असलेल्या झाडीतून अचानक रस्त्यावर येणारे हे पादचारी स्वत:चा जीव तर जोखमीत घालतातच; पण वाहन चालकांसाठीही धोकादायक आहेत.