आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात सुविधांअभावी प्रवाशांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी भागातील रेल्वेस्टेशन परिसरात सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ऊन असो किंवा पाऊस, प्रवाशांना रेल्वेची प्रतीक्षा करत उभे राहावे लागते. बसण्यासाठी बेंच नाहीत, तर शेड टाकलेले नसल्याने पाऊस आणि उन्हाचा सामना करावा लागत आहे. कानाकोपऱ्यात उभे राहून रेल्वेची प्रतीक्षा करत प्रवाशांना थांबावे लागत आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथे सुविधा कधी मिळणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
गारखेडा, सिडको, हडको या नवीन वसाहतींना सोयीचे व्हावे, या उद्देशाने मुकुंदवाडी येथे रेल्वेस्टेशन निर्माण करण्यात आले आहे. मात्र, जयभवानीनगरकडून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हातगाड्या, रिक्षाचालकांचा ठिय्या कायम राहतो. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. याबरोबरच रेल्वेस्टेशनच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहन चोरीच्या घटनाही घडत आहेत. दुचाकी वाहन पार्किंग केल्यानंतरही गाड्या उचलून नेत असल्याने प्रवाशांच्या नातेवाइकांची ससेहोलपट होत आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी दारूडे दारू पिऊन रस्त्यावर कुठेही पडतात. तसेच अंधाराचा फायदा घेत अनेक प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही येथे घडत आहेत. अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात सुरू असतात, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे
चिकलठाणा, मुकुंदवाडी, सिडको, हडको, रामनगर, गारखेडा या भागातील हजारो प्रवासी या रेल्वेस्टेशवरून प्रवास करतात; परंतु बसण्यासाठी सुविधा नाहीत. काही ठिकाणी प्रवासी खाली बसतात. त्यांच्या डोक्यावर लोंबकळणारे पथदिवे असल्यामुळे जीविताला धोका निर्माण झाला आहे. पिण्यासाठी पाणी आणि स्वच्छतागृहे नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणीसुद्धा नसल्यामुळे प्रवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. या समस्येकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांसह स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर सुविधा देऊ शकत नाही
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन फक्त होल्डिंगसाठी आहे. त्या ठिकाणी शौचालयाची सुविधा करू शकत नाही. याबरोबरच रेल्वेस्टेशनचा विकास करण्याचे काम आमच्याकडे येत नाही. या समस्या रेल्वे प्रशासनाकडे मांडाव्यात. जेणेकरून रेल्वेस्टेशनचा विकास होईल. अशोक निकम, स्टेशन मास्टर, मुकुंदवाडी