आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेअभावी बिघडली आघाडी; विधानसभेची पुनरावृत्ती, दोन्हीही पक्षांकडून ए, बी फॉर्मचे वाटप सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससमोर ठेवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यावर पुन्हा चर्चा झाली नाही. त्यातच काँग्रेस कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पालिका निवडणुकीत आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे या दोन्हीही पक्षांच्या वतीने सोमवारी उमेदवारांना ए आणि बी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

काँग्रेसने सायंकाळपर्यंत सर्व वाॅर्डांत, तर राष्ट्रवादीने ७५ वाॅर्डांत उमेदवारांना बी फॉर्म दिल्याने सेना-भाजपची युती झाल्यास तिरंगी, तर एमआयएममुळे काही वार्डांत चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. दोन्हीही पक्ष ११३ वाॅर्डांत उमेदवार देणार असून उमेदवार निश्चित झाले तरीही बंडखोरीच्या भीतीने त्यांच्याकडून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धीस देण्यात आलेली नाही.

गेल्या दोन्ही निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने आघाडी व्हावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती; परंतु जागा वाटपाबाबत चर्चा न झाल्याने अखेर हे दोन्हीही पक्ष रणांगणात स्वतंत्रपणे दाखल झाले. सोमवारी सकाळच्या सत्रात चर्चा होऊन आघाडीची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत होते; परंतु तसे काही झाले नाही. एकमेकांशी बोलणी न झाल्याने दुपारी १२ वाजता राष्ट्रवादीने काँग्रेसने उमेदवारांना बी फॉर्मचे वाटप सुरू केले. इकडे दुपारी १ वाजता काँग्रेसनेही बी फॉर्मचे वाटप सुरू केले अन् आघाडी होणार नाही, हे स्पष्ट झाले.

समर्थनगरातून डॉ. डोंगरे
अनुसूचित जाती (एस. सी.) या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या समर्थनगर वाॅर्डातून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश लढणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने पदाधिकारी डॉ. पवन डोंगरे यांना उमेदवारी दिली आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
काँग्रेसने सर्व जाती-धर्मांना स्थान दिल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला असून उल्कानगरी या वाॅर्डातून ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी अनिल मुळे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे मावळते नगरसेवक अफसर खान या वेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

हाणामारी टाळण्यासाठी अज्ञात ठिकाणी अर्ज वाटप
बी फॉर्म देताना इच्छुकांची गर्दी तसेच ऐनवेळी हाणामारी किंवा गोंधळ होऊ नये म्हणून काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात न बसता स्थानिक पदाधिकाऱ्याच्या घरी बसून बी फॉर्मचे वाटप केले. आज बी फॉर्मचे वाटप होणार आहे, याची कल्पना खूप कमी इच्छुकांना होती. ऐनवेळी मोबाइलवरून पाचारण करण्यात येत होते.
काँग्रेसच्या वतीने निरीक्षक सचिन सावंत, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांच्या उपस्थितीत बी फॉर्म देण्यात आले, तर राष्ट्रवादीकडून बी फॉर्म देताना आमदार सतीश चव्हाण, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, नगरसेवक अभिजित देशमुख आदी उपस्थित होते.

बी फॉर्म वाटप, पण याद्या नाहीच
दोन्हीही पक्षांनी उमेदवारांना बी फॉर्मचे वाटप करून उमेदवारांची यादी निश्चित केली असली तरी सायंकाळी उशिरापर्यंत ती प्रसिद्धीस देण्यात आली नव्हती. अंतिम यादी प्रसिद्ध केली तर बंडखोरी होईल, हा त्यामागील होरा असल्याचे समजते. उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर दोन्हीही पक्षांकडून याद्या प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे, तर रात्री उशिरा आम्ही प्रसिद्धीस देऊ, असे काँग्रेसच्या वतीने प्रवक्ते डॉ. पवन डोंगरे यांनी सांगितले. मागील तीन निवडणुकांच्या वेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती. या वेळी चार दिवस आधी यादी जाहीर करू, असे काँग्रेसने सांगितले होते. प्रत्यक्षात परंपरेत काहीही बदल झाला नाही.

राष्ट्रवादीत जुनेच चेहरे
राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज देताना जुन्याच कार्यकर्त्यांना न्याय दिला. माजी व मावळत्या नगरसेवकांना त्यांनी प्राधान्य दिले. मावळते नगरसेवक काशीनाथ कोकाटे (एन-८), माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, वसंत देशमुख, प्रकाश खंदारे, ख्वाजा शरफोद्दीन यांचा समावेश आहे.
पुढे वाचा... मातब्बर इच्छुकांमुळे शिवाजीनगर वाॅर्ड चर्चेत