आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला अधिकाऱ्याकडे सापडले अर्धा किलो सोने, लाचलुचपत विभागाकडून झाडाझडती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ जालना - वाळू वाहतुकीचे पकडलेले टिप्पर सोडून देण्यासाठी व पुढेही कारवाई न करण्यासाठी तीन लाखांची लाच घेताना पकडलेल्या अंबडच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर-पालवे यांच्या औरंगाबादेतील घरात अर्धा किलो सोने, चार प्लॉटची कागदपत्रे आणि २९ हजार रुपये रोख रक्कम आढळली.

शुक्रवारी रात्री ९.३० पासून सुरू झालेले त्यांच्या औरंगाबाद आणि अंबड येथील घराच्या झाडाझडतीचे काम सकाळी ११ पर्यंत सुरू होते, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विवेक सराफ यांनी दिली.

शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास अंबडमध्ये अंबड-पाचोड रस्त्यावरील मल्हार चायनीज अँड बिर्याणी हाऊससमोर लाच घेताना उपविभागीय अधिकारी सविता मनोज चौधर-पालवे आणि श्रीराम नागरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली होती. नागरे हा पालवे यांच्यासोबत दलाल म्हणून काम करताे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सकाळपर्यंत पालवे यांच्या औरंगाबादमधील गारखेडा परिसरातील सह्याद्री हिल्स येथील घराची तसेच ते भाड्याने राहत आलेल्या अंबड येथील घराचीसुध्दा झडती घेतली. सह्याद्री हिल्स येथील घरात १० लाख रुपये किमतीचे सोन्या -चांदीचे दागिने सापडले. सोबतच नावावर असलेल्या चार प्लॉटची कागदपत्रे आणि २९ हजार रुपये रोख रक्कम पथकाने ताब्यात घेतली. अंबड येथील घरातून पथकाला २ लाख ११ हजार८७० रुपयांची रक्कम आढळून आली. पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक ज्ञानदेव गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विवेक सराफ, हेमंत सोमवंशी आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, चौधर-पालवे व दलाल नागरेविरुद्ध शनिवारी सकाळी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले असता तदर्थ जिल्हा न्यायाधीश राजश्री प. परदेशी यांनी दोघांनाही प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दर गुरुवारी एसीबी कार्यालयात हजेरी लावण्याचे सांगितले.

सविता चौधर-पालवे यांनी मूळ तक्रारदाराकडे अंबड तहसील कार्यालयात लावलेले वाळू वाहतुकीचे दोन टिप्पर व इतर सहा वाळू वाहतुकीच्या गाड्या सोडण्यासाठी व पुढे सदर गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी सुरुवातीला ८ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ६ लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल करण्यात आले होते. दरम्यान, त्यापैकी ३ लाख रुपये लाचेची रक्कम श्रीराम नागरे याच्यामार्फत शुक्रवारी रात्री ८.१० वाजतास्वीकारल्यावर एसीबीच्या पथकाने त्याला पकडले.
बातम्या आणखी आहेत...