आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! बनावट क्रेडिट कार्डने केली लाखाची खरेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रेडिटकार्ड वापरत असाल तर सावधान.. तुम्ही वापरत असलेल्या क्रेडिट कार्डची नक्कल करून लोकांना फसवणारी टोळी सध्या शहरात सक्रिय आहे. बद्री तुळशीराम जाधव यांना या टोळीने ६६ हजार ३७० रुपयांनी गंडवले. जाधव यांच्या अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून बनावट केडिट कार्ड बनवून या टोळीने त्यांना लुटले. दुसऱ्या एका घटनेत क्रेडिट कार्डधारकाला ३९ हजार ९८० रुपयांनी गंडवण्यात आले.

२२ सप्टेंबर रोजी जाधव घरीच होते. क्रेडिट कार्डही त्यांच्याकडेच होते. त्यांच्या मोबाइलवर पहिल्यांदा क्रेडिट कार्डद्वारे ३५ हजार रुपयांची खरेदी केल्याचा एसएमएस आला. त्यानंतर काही वेळाने पुन्हा ३० हजार ५०० रुपयांची खरेदी केल्याचा एसएमस आला. संभा शिवा सर्व्हिसेस या ठिकाणी कार्ड स्वॅप करण्यात आले होते. त्यांनी ही माहिती तत्काळ बँकेला कळवून आपल्या कार्डवरील व्यवहार थांबवले. या कार्डची कर्जमर्यादा ७५ हजार रुपये इतकी होती. त्यामुळे भामटे अधिक गंडा घालू शकले नाहीत. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली असून पोलिस निरीक्षक नाथा जाधव पुढील तपास करत आहेत. जाधव यांनी आयुक्तालयातील सायबर क्राइम विभागाकडेही तक्रार दाखल केली आहे.

काळजी घेणे गरजेचे
कोणत्याही क्रेडिट, डेबिट कार्डवरील डाटा भामट्यांनी मिळवल्यावर बनावट कार्ड तयार करणे अत्यंत सोपे असते. या क्षेत्रातील माहितगार व्यक्ती असे कार्ड तासाभरात तयार करून त्यावर डाटा इंपोज करू शकते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्राहकांनी काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे. रणजित देशमुख, आयटीतज्ज्ञ

सिडकोतील ग्राहकाचीही फसवणूक
सिडकोएन-५ भागात राहणाऱ्या मनोज पांडुरंग व्यवहारे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला. त्यांचेही अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे भामट्याने २२ सप्टेंबर रोजी ३९ हजार ९८० रुपयांची खरेदी केल्याचे उघड झाले आहे. सिडको पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली असून पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी पुढील तपास करत आहेत.

असे बनवले डुप्लिकेट क्रेडिट कार्ड
जाधवयांनी बँकेत चौकशी केली असता बँक अधिकाऱ्याने त्यांना तुमच्या कार्डचे भामट्यांनी डुप्लिकेट कार्ड बनवले असण्याची शक्यता वर्तवली. कार्डधारक ज्या वेळी एखाद्या ठिकाणी खरेदी करून कार्ड स्वॅप करतात त्याच वेळी भामटे त्याच ठिकाणी कार्डचे स्कॅनिंग करून डुप्लिकेट कार्ड तयार करतात. जाधव यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला असावा, असे बँकेच्या कर्मचाऱ्यांचे मत आहे. या महिन्यात बद्री जाधव यांनी १२ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे हॉटेल मेरी गोल्ड, १६ सप्टेंबर रोजी हॉटेल लॉर्ड आकार येथे आणि १७ सप्टेंबर रोजी प्रोझोनमधील स्टार बझारमध्ये कार्ड स्वॅप केले होते.