आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणे हटवून व्यावसायिकांना बेरोजगार करू नका, लाल बावटा टपरीधारक संघटनेचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - कुटुंबाची उपजीविका अवलंबून असलेले व्यवसाय अतिक्रमण हटवल्याने बंद पडणार आहेत. त्यातून व्यावसायिकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या अनुषंगाने आठवडे बाजारतळावरील अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्टप्रणीत लाल बावटा टपरीधारक संघटनेच्या वतीने कामगार नेते बुद्धिनाथ बराळ यांनी वाळूज ग्रामपंचायतीकडे बुधवारी केले आहे. त्यांच्यासोबत या वेळी १५० वर टपरीधारक उपस्थित होते. तेव्हा सरपंच सुभाष तुपे यांनी त्याबाबत विचार करण्याचे आश्वासन बैठकीत दिले आहे. 
 
येथील बाजारतळाच्या दर्शनी भागात नगर-औरंगाबाद महामार्गाला लागून शासकीय गाेदामालगत पक्की अतिक्रमणे झाली आहेत. त्याचबरोबर कमलापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आठवडे बाजारतळाला विळखा घातल्याने बाजारातील व्यावसायिकांना दुकाने थाटणे अवघड होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने ऑगस्ट रोजीच्या मासिक बैठकीत अतिक्रमणे हटवण्याचा ठराव मंजूर केला अाहे. सर्व्हेनंतर मार्किंग करून पोलिस संरक्षणात अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. या माेहिमेत तब्बल ५० वर अतिक्रमणे हटवली जाणार असल्याचे ग्रामपंचायतीने म्हणणेे आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी आयटकचे कामगार नेते बुद्धिनाथ बराळ यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सुभाष तुपे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 
 
बेरोजगार हाेऊन ओढवणार उपासमारी 
ग्रामपंचायत सभागृहात या प्रश्नावर बैठक घेण्यात झाली. तेव्हा अतिक्रमणांमुळे बाजारतळावरील जागा अपुरी राहिली आहे. त्यामुळे आठवडे बाजार भरण्यासाठी व्यापारीवर्गाला गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी झालेली अतिक्रमणे हटवून बाजारतळ मोकळा करणार असल्याची भूमिका ग्रामपंचायतीची असल्याचे सरपंच तुपे यांनी स्पष्ट केले. तेव्हा अतिक्रमण हटवल्यास सर्व व्यावसायिक बेरोजगार होणार आहेत. या ठिकाणी करीत असलेल्या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबांची गुजराण चालते. अतिक्रमणे हटवण्यात आली तर व्यवसाय बंद पडून टपरीधारकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने अतिक्रमणे हटवण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असे कामगार नेते बुद्धिनाथ बराळ यांनी म्हटले. त्यावर विचार करण्याचे आश्वासन सरपंच तुपे यांनी दिले. मात्र, कमलापूर रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी रस्त्याला अडथळा होईल अशी दुकाने थाटू नयेत. नसता पोलिसांच्या मदतीने तशी अतिक्रमणे कुठलीही पूर्वसूचना देता काढण्यात येतील, असे सरपंच तुपे यांनी बैठकीत बजावले. त्यावर टपरीधारकांनी संमती दिली. 
 
जागेचा सर्व्हे करून जास्तीचे अतिक्रमण काढणार 
१५ वर्षांपूर्वी अतिक्रमणधारकांच्या जागांचा सर्व्हे करण्यात आलेला आहे. त्यानुसार तेव्हा ग्रामपंचायत रेकॉर्डला जागांच्या लांबी रुंदीच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. परंतु अतिक्रमणधारकांनी त्यानंतर मोठ्या प्रमाणावर जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवरील जागांचे मोजमाप बघून अतिक्रमणांचा तसा सर्व्हे केला जाईल. रेकॉर्डवरील अतिक्रमणाव्यतिरिक्त जागेवर असलेले अतिक्रमण पोलिस संरक्षणात काढले जाईल. त्यातून व्यावसायिकांवर उपासमारीची किंवा बेरोजगार होण्याची वेळ येणार नाही. या सर्व व्यावसायिकांनी तसे ग्रामपंचायतीकडे टपऱ्या असल्याबाबत त्यांच्या मूळ जागेबाबत लिहून दिलेले आहे. त्यामुळे अतिरिक्त जागा जरी मोकळी झाली, तरी आठवडे बाजाराचा प्रश्न काही अंशी मिटण्यास मदत हाेईल.अतिक्रमणधारकांनी ग्रामपंचायत प्रशासनाची बाजू समजून घेतली पाहिजे. कारण हा बाजार आपल्या सर्वांचा असल्याचे स्पष्टीकरण सरपंच तुपे यांनी दिले. ग्रामपंचायत सदस्य फय्याज कुरेशी, नंदकुमार काबरा, शांतिनाथ फांदाडे, लतीफ पटेल, गणेश सुरडकर, पोपट केरे, बाळासाहेब सरोदे, भाऊसाहेब राऊत यांच्यासह टपरीधारकांची मोठी उपस्थिती होती. 
 
गावातील बेरोजगारांनाटपऱ्यांमुळे रोजगार मिळाला आहे. १५० वर बेरोजगार कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवत आहेत. अतिक्रमणे हटवून त्यांंची रोजी-रोटी हिसकावून घेणार का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत टपरीधारकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी हा लढा आहे. या प्रश्नावरच गुरुवारी सायंकाळी जाहीर सभा घेणार आहे. 
- बुद्धिनाथ बराळ , कामगार नेते 
बातम्या आणखी आहेत...