आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित कला महोत्सव: कलावंतांनी गाजवला दिवस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ढिपाडी ढिचांग. ढिचपाडी ढिपांग..अशा एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांवर नृत्य करत कलावंतांनी ललित कला महोत्सवाची प्राथमिक फेरी गाजवली.

मराठवाडा कला विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ललित कला महोत्सवाची प्राथमिक फेरी गुरुवारी संत एकनाथ नाट्यमंदिरात झाली. या वेळी नृत्य, नाट्य, गायन, वादन, अभिनय, चित्र अशा वैैविध्यपूर्ण स्पर्धांमध्ये सहभागी होत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण करत जल्लोष केला. स्पर्धेत 180 शाळांनी सहभाग नोंदवला. एकल गायन, जोडी गायन, नृत्य, समूहनृत्य, समूह गायन अशा स्पर्धांमध्ये कलावंत दंग झाले.

तीन वर्षांपुढील विद्यार्थ्यांचा समावेश होता. मराठवाड्यातील हौशी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच कलेच्या क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी, स्पर्धेचा अनुभव यावा यासाठी अखंडपणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी व्यक्त केले. पालकांनाही यानिमित्ताने सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. मतिमंद मुलांचे नृत्य लक्षवेधी ठरले. लहानग्यांनी फिल्मी गीतांवर प्रेक्षागृहातील सर्वांना ताल धरण्यास भाग पाडले.

या महोत्सवाची अंतिम फेरी 3 फेब्रुवारीला संत एकनाथ रंगमंदिरात होणार आहे. गुरुवारी झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये एस. एस. पठाण, शिवन देशमुख, विकास बनकर आणि राहुल काकडे यांनी परीक्षणाचे काम पाहिले. रजनी जगताप आणि अँड. शिल्पा मुळे यांनी सूत्रसंचालन केले.

5 लाखांहून अधिक स्पर्धकांना संधी
मराठवाडा कला विकास महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या या महोत्सवात गेल्या 24 वर्षांमध्ये विक्रमी 5 लाखांहून अधिक हौशी स्पर्धकांना कलागुण सादरीकरणाची संधी देण्यात आली आहे.

पालकांचाही जल्लोष
बालवयामध्ये निरीक्षण शक्तीच्या जोरावर सध्याची पिढी अफलातून सादरीकरण करते, याचा अनुभव नृत्यप्रकार पाहताना येत होता. आपली चिमुरडी अदाकारीने सर्वांना ठेका धरायला लावत आहे, हे पाहून पालक आनंदीत झाले होते.