आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ वर्षांपूर्वीच जमिनी संपादन; आज 70 शेतकऱ्यांना 2 कोटी 70 लाखांचे धनादेश वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- मागील नऊ वर्षांपासून रखडलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी जमीन घेतलेल्या ७० शेतकऱ्यांना आज आमदार संदिपान भुमरे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता अप्पासाहेब निर्मळ यांच्या प्रमुख उपस्थितीत २ कोटी ७० लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले. नऊ वर्षांपासून रखडलेल्या योजनेचे काम सुरू झाल्याने ५५ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. जर योजना मार्गी लागली  तर तालुका टँकर मुक्त होईल यात शंका नाही.  
 
पैठण तालुक्यात ५५ गावांहून अधिक गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून ही योजना अनेक वर्षांपासून रखडली होती. मात्र नुकतेच राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी पैठणचा दौरा केला होता. यात ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना मार्गी लागणे आवश्यक असल्याची बाब शेतकऱ्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिल्याने आज तालुक्यात वाहेगाव, पाचलगाव, वरुडी, देनतपूर या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या योजनेसाठी घेण्यात आल्या त्या ७० शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील निधीचे वाटप करण्यात आले. यापूर्वी केवळ १५ लाखांचे वाटप करण्यात आले होते. आज दोन कोटी ७० लाख रुपये  हे डाव्या कालव्याच्या संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला देण्यात आला. या वेळी आमदार संदिपान भुमरे यांनी मोबदल्यापासून वंचित  शेतकऱ्यांना लवकर मोबदला देण्याचे आश्वासन दिले. अप्पासाहेब निर्मळ यांनी शेतकऱ्यांना जोपर्यंत ही योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण लढा देत राहणार असल्याचे सांगितले.

...तर विरोधाची शक्यता
या योजनेमध्ये ५५ गावांची तहान भागली जाणार असून चाळीसहून अधिक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी संपादित केल्या जाणार आहेत. आजपर्यंत कालवे तयार करण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. तो वेळेत मोबदला न मिळाल्याने केला होता. आता या चार गावांतील शेतकऱ्यांच्या हाती रक्कम पडली तर उर्वरितांना मोबदला मिळणार हा प्रश्न कायम आहे. 

कामाची शाश्वती नाही   
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजना जाहीर केली होती. त्यावर शंभर कोटींच्यावर खर्च करून कामे करण्यात आली. यातील अनेक कामे सध्या अपूर्ण असून २२२ कोटींची ही योजना येथील अधिकाऱ्यांमुळे आज चारशे कोटींच्यावर गेली आहे. आज जरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला असला तरी योजना कधी पूर्ण होणार याची शाश्वती नसल्याचे दिसत आहे.  
 
अधिकारी पहिल्यांदाच गावात   
योजनेसाठी नऊ वर्षांपासून जमीन संपादित केल्या असताना ही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला न दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी जमिनी दिल्या असताना त्यांचे कालवे बुजवले होते. आज मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.आज हा मोबदला दिल्यानंतरच संबंधित अधिकारी गावात फिरकले  असल्याचे दिसून आले.

लवकर मोबदला द्या
आमच्या सरकारच्या कार्यकाळात ही योजना मार्गी लागत आली होती. आता चार गावांतील शेतकऱ्यांना पैसे मिळाले. उर्वरित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला लवकर दिला जावा.
- संजय वाघचौरे, माजी आमदार, पैठण
बातम्या आणखी आहेत...