आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिकाम्या भूखंडावर परस्पर क्रीडांगण उभारून सुरू केला शाळेसाठी वापर, संस्थाचालकाचा प्रताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुकुंदवाडी सिडको एन-२ पायलटनगरात एका संस्थाचालकाने सिडको वा मनपाची कुठलीही परवानगी घेता विमानतळालगतची जागा हरितपट्टा म्हणून विकसित केली तिचा आपल्या संस्थेसाठी सर्रास वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्याने शाळाही निवासी भूखंडावर उभारली असल्याचे डीबी स्टारच्या तपासातून पुढे आले आहे. सिडको हरितपट्ट्यांची देखभाल मनपाकडे हस्तांतरित केल्याचे सांगते, तर मनपा ती जागा विमान प्राधिकरणाने पत्र दिल्याने हरितपट्टा म्हणून विकसित करण्यासाठी परवाना देताच येत नसल्याचे म्हणते. या गोंधळात इकडे संस्थाचालकाने मात्र परस्पर तेथे क्रीडांगण, पाणपोई, नेटशेड आदी सुविधा उभारून शाळेसाठी वापरणे सुुरू केले आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात आल्या होत्या त्यांना शासनाने एकूण जमिनीपैकी मावेजा म्हणून साडेबारा टक्के जमिनी दिल्या होत्या. त्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यासाठी शासनाने सिडको प्राधिकरणाची निवड केली. सिडकोने सन २००० मध्ये १६२६ चौरस फुटांच्या ३१३ प्लॉटचा आराखडा तयार केला होता. त्यात वैद्यकीय, शैक्षणिक, हरितपट्टा, सात मीटरचे रस्ते आणि पाच मीटरचे फुटपाथ नियमानुसार सोडण्यात आले होते. सिडकोने वाटप केलेले भूखंड हे केवळ निवासी भूखंड म्हणून दिले होते. मात्र, या संस्थाचालक रमेश अवचार यांनी यातील प्लॉट क्रमांक १९९, २०० आणि २०१ असे तीन वेगवेगळे प्लॉट खरेदी करून त्यावर बालविकास जनकल्याण सांस्कृतिक सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळ संंचालित वरद विद्या मंदिर राजहंस माध्यमिक विद्यालयाची उभारणी केली. संस्थेला लागूनच विमानतळाच्या भिंतीच्या दिशेने सात मीटर रुंद रस्ता आणि ३० मीटर रुंदीची जागा आहे. त्यावर क्रीडांगण आणि हरितपट्टा विकसित करून त्या जागेचा वापर संस्थेसाठी सुरू केला आहे. 

संस्थाचालकाचा परस्पर कारभार 
विमानतळ प्राधिकरणाने भविष्यात विमान उड्डानांना पशुपक्ष्यांचा त्रास होऊ नये यासाठी विमानतळाच्या सुरक्षाभिंतीलगत १५ मीटर अंतरापुढे कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, असे निर्देश दिलेले आहेत. दुसरीकडे भिंतीलगत सिडकोने टाकलेले हरितपट्ट्याचे आरक्षण रद्द करण्याबाबत सिडको आणि मनपालाही विमानतळ प्राधिकरणाने कळवलेले आहे. असे असताना इकडे वरील संस्थेने या जागेवर वृक्षारोपण केले. तसेच क्रीडांगण, काँक्रीट पाणपोई, नेटशेड उभारून त्याचा संस्थेसाठी सर्रास वापर सुरू केला आहे. दुसरीकडे निवासी तत्त्वावर वाटप केलेल्या तीनही भूखंडावर शाळा उभारली. एवढे सगळे होऊनही सिडको आणि मनपाच्या भूमापन, नगररचना, आणि वसाहत अधिकाऱ्यांना हा प्रकार माहिती नाही. वृक्षारोपणाच्या नावाखाली संस्थेने जागा ताब्यात घेण्याचा खटाटोप केला आहे. 

माझे कुठलेही काम बेकायदेशीर नाही 
शाळेच्या परिसरात रेल्वेलाइनला लागून असलेले वसाहतधारक उघड्यावर शौचास बसत असत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. हा प्रकार बंद करण्यासाठी मी शाळेसमोरील ग्रीनबेल्ट विकसित केला आहे. जरी मी बेकायदा काम केले असले तरी ते योग्यच आहे. काहीही वाईट काम केलेले नाही. येथे गरिबांच्या मुलांसाठी शाळेची सोय झाली. माझे कुठलेही काम बेकायदेशीर नाही.
- रमेश अवचार, संस्थाचालक

काय म्हणते प्रशासन 
मुकुंदवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको प्रशासनाने घेतल्या. त्यांना साडेबारा टक्के प्लॉट विकले. तेथे ३१३ प्लॉट टाकले आहेत. वसाहतधारकांना त्रास होऊ नये यासाठी वैद्यकीय आणि शैक्षणिक झोन वेगळे केले आहेत. २००६ मध्ये सिडकोचे मनपात हस्तांतर झाल्यानंतर आम्ही या परिसरातील सर्व सेवा-सुविधा मनपात हस्तांतर केल्या आहेत. मात्र भूखंडाच्या वापरात बदल केला असेल तर त्याची पाहणी करून आम्ही या प्रकरणी नक्कीच कारवाई करू.
-  माधव सूर्यवंशी, भूमापन अधिकारी, सिडको 

विमान प्राधिकरणाने सुरक्षा भिंतीलगत हरितपट्टा विकसित केल्यास त्याचा आडोसा घेऊन इतर वसाहतधारक अतिक्रमण करतील आणि विमान उड्डाणांना त्याचा त्रास होईल या अनुषंगाने एका बैठकीत चर्चा झाली होती. त्यामुळे सुरक्षाभिंतीलगत १५ मीटर अंतरापर्यंत आम्ही हा हरितपट्टा विकसित केला नाही. असे असताना येथे असा खटाटोप करणे चुकीचे आहे. याची पाहणी करून संबंधित संस्थाचालकावर कारवाई करण्यात येईल.
- वामन कांबळे, मालमत्ता अधिकारी, मनपा 
बातम्या आणखी आहेत...