आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींची जमीन राजकारण्यांच्या घशात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सहकारातून समृद्धी या उद्देशाने राज्यात सुरू झालेली सहकार चळवळ मोडीत निघाली. मात्र, सहकारातून ‘स्वउद्धार’ करण्याचा प्रकार जालन्यातील राजकारण्यांनी केल्याचे समोर आले आहे. पंधराशे कोटी रुपये किमतीची जालना सहकारी जिनिंग प्रेसिंगची जमीन अवघ्या सात कोटींत गिळकृंत केली आहे. पणन संचालकांनीदेखील हातभार लावून ही जमीन बड्या नेत्यांच्या स्वाधीन केल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालना सहकारी जिनिंग प्रेसिंग व ऑइल मिल सोसायटी लि.च्या मालकीची देऊळगावराजा मार्गावरील सर्व्हे क्रमांक 209 मध्ये 22 एकर 35 गुंठे जमीन होती. मिल बंद पडल्यानंतर काही जमिनीवर अतिक्रमण झाले.

जमिनीवर अतिक्रमण होत असल्याचे कारण पुढे करीत शिल्लक ताब्यात राहिलेल्या जमिनीची विक्री करून येणार्‍या पैशातून दुसरीकडे जागा घेण्याचा ठराव संस्थेच्या सदस्यांनी 22 जानेवारी 2009 मध्ये घेतला. त्यानुसार संस्थेच्या 1 ऑगस्ट 2011 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व्हे क्रमांक 209 मधील सिटी सर्व्हे क्रमांक 1994 मधील 74 लाख 123 चौरस मीटर जमीन विक्री करणे व नवीन जागा खरेदी करण्याबाबत ठराव संमतही करून घेतला.

या जागेच्या मूल्यांकनाची जबाबदारी महाजन अँड असोसिएट्सकडे 5 नोव्हेंबर 2011 रोजी सोपवण्यात आली. त्यांच्या मूल्यांकनानुसार त्या जागेची किंमत 5 कोटी 93 लाख 36 हजार 800 रुपये ठरवण्यात आली. मात्र, जालना सहकार विभागाच्या दुय्यम निबंधकांनी त्या जागेचे मूल्य 3 कोटी 33 लाख 77 हजार 54 एवढे असल्याचा प्रस्ताव दिला. असोसिएट्सने काढलेले मूल्य जास्त असल्याचे स्पष्ट करीत जिल्हा निबंधकांनी पणन संचालक, पुणे यांना जमीन विक्रीसाठीच्या परवानगीचा प्रस्ताव पाठवला. संचालकांनीदेखील कोणताही आक्षेप न घेता नोव्हेंबर 2012 मध्ये जमीन विक्रीची परवानगी देऊन टाकली. जमीन विक्रीआधी वर्तमानपत्रात जाहिरात देणे गरजेचे होते. मात्र, मिलच्या सदस्यांनी बड्या नेत्यांसाठी नियमात शिथिलता देत र्मजीतील लोकांचेच प्रस्ताव सादर करून जमीन विक्री झाल्याचे दाखवले.


कोट्यवधींचा घोटाळा.
- बड्या नेत्यांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून जिनिंगच्या जमिनीची परस्पर विक्री केली. या व्यवहारात घोटाळा झाला असून न्यायालयात दाद मागणार आहोत. - अब्दुर रशीद पहेलवान, नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस,

- पणन संचालकांच्या मंजुरीनंतर जिनिंगची जमीन विक्री करण्याची प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2014 रोजी पार पाडली. या लिलावात जवळपास पंधरा जणांनी बोली लावली होती. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा उपनिबंधकांना पाठवण्यात येईल. एस. बी. भालेराव, सहायक निबंधक, सहकार