आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबदची नैसर्गिक तटबंदी उद्ध्वस्त होणार; या डोंगरकाप्यांना आवरणार कोण?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहराचे जुने नाव खडकी आहे. डोंगरात खडकाळ पट्टय़ांवर असल्यामुळेच शहराला हे नाव पडले. शहराच्या आजूबाजूला 60 पेक्षा जास्त डोंगर आहेत, तर जिल्ह्यात तब्बल 200 च्या आसपास डोंगर आहेत. मात्र, गेल्या काही वर्र्षांपासून या डोंगरांची कत्तल केली जात आहे. शासनानेच त्याचे कंत्राट दिल्याने कुणीही ते वाचवण्यासाठी पुढाकार घेत नाही. डोंगरांमुळे ढग अडतात व पाऊस पडतो हे साधे विज्ञानही कोणी लक्षात घेत नाही. डोंगरकाप्यांची एवढी दहशत आहे की त्यांच्या वाटेला जाण्याची कुणी हिंमत करत नाही. त्यामुळेच जेवढी रॉयल्टी भरली त्यापेक्षा कितीतरी जास्त माती व खडी ते डोंगर पोखरून काढतात. याकडे शासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात.
शहराची महिरप विद्रूप होतेय
शहराच्या दक्षिणेला देवळाई गाव, पश्चिम दिशेला तिसगाव-वाळूज तर उत्तरेला हसरूल-सावंगी येथे डोंगर कापण्याचे काम गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सुरू आहे. शासनाच्या परवानगीनेच खडी, मुरूम यासाठी हा उपद्व्याप सुरू आहे. अनेक ठिकाणी तर शासनाची परवानगीही घेतली जात नाही. उलट डोंगरकापे डोंगरांबरोबरच जमीनही पोखरून मुरूम काढत आहेत. देवळाई हे गाव तर हिरव्यागार डोंगररांगांच्या कुशीतच वसले आहे. शहरापासून जवळ असूनही तिकडे चिटपाखरूही दिसत नाही. रहदारी कमी असल्याने डोंगर पोखरण्याचे सर्वाधिक प्रमाण याच भागात आहे.
तीसगावातला डोंगर नामशेष!
वाळूजजवळचा तिसगावातला डोंगर तर येत्या काही वर्षांत भुईसपाट झालेला दिसेल. त्याची कटाई जोरात सुरू आहे. काही दिवसांतच तो नामशेष होईल अशी परिस्थिती आहे. इकडे हसरूल-सावंगीतही हीच परिस्थिती आहे.
96 खदानींना दिले कंत्राट
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 96 खदानी डोंगर पोखरण्याचे काम करत आहेत, तर एकट्या औरंगाबाद तहसीलमध्ये 60 खदानींना हे काम देण्यात आले आहे. या सर्व खदानधारकांनी जिल्हा प्रशासनाकडे रॉयल्टी भरून हे काम हाती घेतले आहे. एकदा शासनाची परवानगी मिळाली की तो अख्खा डोंगरच आपल्या मालकीचा आहे या आविर्भावात डोंगर पोखरण्याचे काम वर्षानुवर्षे सुरू राहते. यात किती ब्रास मुरूम काढायचा याचे गणित ठरलेले असते. तेवढी रॉयल्टीही ठरलेली असते; पण याचे कोणतेही ऑडिट मायनिंग विभागाकडे नाही. मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दाखवून हा विभाग निसर्गसंपत्तीचा र्‍हास उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. कोणी किती ब्रासचा डोंगर खोदायचा हे ठरलेले असते, पण हा विभाग तपासणी न करण्याचे औदार्य दाखवतो.
एकाही डोंगरकाप्यावर गुन्हा दाखल नाही
वाळू तस्करीवर शासनाचे लक्ष आहे. तसे लक्ष डोंगरकाप्यांवर नाही. कोणता खदानमालक काय करतो आहे याचे ऑडिट होत नाही. ते होत असले तरी कागदावर असते. कारण आजवर किती डोंगरकाप्यांवर कारवाई झाली याचा तपशील गौण खनिज विभागाकडे नाही. त्याच्याकडे यादी आहे ती फक्त वाळू तस्करांच्या वाहनांवर झालेल्या कारवाईची .
14 लाख महसूल गोळा झाला, पण..
पैठणची गोदावरी नदी जवळ असल्याने वाळू खूप चांगली मिळते. या वाळू तस्करांवर प्रशासनाचे लक्ष आहे. कारण गेल्या वर्षात 19 प्रकरणांत 48 वाळूचे ट्रक पकडले. एकूण 97 केसेस दाखल झाल्या. यातून 14 लाख 45 हजार 525 रुपयांचा महसूल गोळा झाला; पण किती डोंगरकाप्यांवर कारवाई केली, याचा स्पष्ट तपशील गौण खनिज विभागाकडे नाही.
बादशहा औरंगजेबाने हेरले होते महत्त्व
औरंगाबाद शहराला नैसर्गिक तटबंदी आहे हे मोगल बादशहा औरंगजेबाच्या लक्षात आले होते. देवगिरीचा किल्ला अभेद्य राहिला त्याचे कारणही हेच होते. या किल्ल्यासारख्या अनेक प्रतिकृती आपल्या आजूबाजूला आहेत. त्यामुळेच प्रत्येक डोंगराचे हे ऐतिहासिक महत्त्वही जपले पाहिजे.
डॉ. किशोर पाठक, पक्षी व निसर्गमित्र
डोंगरकाप्यांची लॉबी
आपल्या शहरात डोंगरकाप्यांची मोठी लॉबीच आहे. निसर्गाचे नुकसानही थांबवले पाहिजे याकडे कोणाचेही लक्ष नाही. डोंगर कितीही कापले तरी बांधकामे संपणारी नाहीत याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. तातडीने याबाबत कडक कायदे करण्याची नितांत गरज आहे. हा प्रश्न गांभिर्याने हाताळण्याची गरज आहे.
बजरंग विधाते, निसर्गप्रेमी
आमच्या डोंगरांना धोका नाही
सातारा परिसरात डोंगर कापण्याचे काम जोरात सुरू आहे हे खरे आहे; पण वन विभागाच्या डोंगरांना त्यांनी अजून हात लावलेला नाही. आमच्या डोंगरांच्या जवळच हे काम सुरू आहे. पण या खदानी शासनानेच दिल्या आहेत. आमच्याकडे 253 हेक्टर एवढी जमीन ताब्यात आहे.
ओमप्रकाश चंद्रमोरे, जिल्हा वनसंरक्षक