आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षापासून ई- फेरफार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकाला रजिस्ट्री करून द्यायची, त्याचा फेरफार होण्यापूर्वी तीच जमीन दुसर्‍याला विकायची. मूळ मालक बाजूलाच असताना जमिनीची परस्पर विक्री करायची, कोणत्याही कागदपत्राच्या आधारे दुसर्‍याचीच जमीन तिसर्‍याने हडप करायची या प्रकारांना यापुढे पायबंद बसेल. कारण 1 जानेवारीपासून औरंगाबाद जिल्ह्यात ई- फेरफार सुरू होत आहे. रजिस्ट्री झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन पद्धतीने सातबारावर नोंदी होणार असल्याने जमीन हडपणे, परस्पर विक्री करणे असे प्रकार होणार नाहीत.

राज्यात ई-सातबारा योजना लागू करण्यात आल्यानंतर सातबारे संगणकावर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आजघडीला घरबसल्या कोणत्या गटातील किती जमीन कोणाच्या नावावर आहे, हे सहज बघता येते. त्यानंतर आता फेरफारही ऑनलाइन करण्याचे ठरवण्यात आले असून औरंगाबाद जिल्ह्यात याचे काम वेगाने सुरू आहे. 1 जानेवारीपासून फेरफारही संकेतस्थळावर बघता येणार आहेत.

ई-फेरफार करण्यासाठी महसूल विभागाने गटनिहाय एकूण क्षेत्र आणि सातबारावरील क्षेत्र याची मोजणी सुरू केली आहे. एकूण क्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी सातबारावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील क्षेत्र यातील तफावत दूर केली जाईल.

खासरपट्टा, बांध, पाणंद रस्ता, विहिरी, तलाव, संपादित करण्यात आलेले क्षेत्र, गायरान याची नोंद सातबारावर नसली तरी त्याचे क्षेत्र उपयोगात आणून त्याची सर्रास विक्री होते. या प्रकाराला या मोहिमेत लगाम बसणार आहे.