आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी चाचपणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विमानतळावरील सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करून प्रत्येक प्रवाशाला त्याच्या मागणीनुसार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळ प्राधिकरण प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच रेस्टॉरंटही सुरू करण्यात आले. आता एक पाऊल पुढे टाकत परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी ललित ग्रुपकडून प्रयत्न सुरू आहेत. व्यावसायिक बाजू पडताळूनच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे विमानतळ निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी सांगितले.
अजिंठा, वेरूळ, घृष्णेश्वर या जागतिक पर्यटन दर्शन स्थळांबरोबरच औद्योगिक, शैक्षणिक, मेडिकल, व्यापाराचे हब असलेल्या औरंगाबादचा झपाट्याने विस्तार होत आहे. पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांसाठी सध्या पाच विमानसेवा सुरू आहेत. याशिवाय चीन, जपान, जर्मनी, श्रीलंका आदी देशांतून गतवर्षी पर्यटकांनी विशेष विमानाने ये-जा केली. नाइट पार्किंग, कार्गो सेवेला आठ दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेटची सेवा प्रस्तावित आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेसाठीही वेगाने प्रयत्न होत आहेत. श्रीलंका, जपान, जर्मनी या आंतरराष्ट्रीय सेवा सुरू व्हाव्यात यासाठी विमान प्रशासन एमटीडीसीच्या संयुक्तरीतीने हालचाली सुरू आहेत.

सुमारे चार लाख प्रवासी वर्षभरात विमातळावरून ये-जा करतात. पण प्रवाशांना विमानतळ परिसरातच दर्जेदार आणि त्यांना हव्या त्या खाद्यपदार्थांबरोबरच वातानुकूलित लॉजिंग आणि प्रवासाची व्यवस्था आज उपलब्ध नाहीत. ललित ग्रुपच्या संचालिका ज्योत्स्ना सुरी शहरात आल्या असता त्यांनी विमानतळ निदेशक वार्ष्णेय यांच्याशी पंचतारांकित हॉटेल सुरू करण्याबाबत चर्चा केली. दिल्ली वरिष्ठ कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेऊनच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे वार्ष्णैय यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...