आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंताच निघाला लॅपटाॅपचा चोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लॉटरी खेळून कर्जबाजारी झालेल्या अभियंत्याने कर्ज फेडण्यासाठी लॅपटॉप, संगणक, कॅमेरा चोरी करण्याचा शहरात धडाका लावला. विशेष म्हणजे त्याने चाेरीसाठी डॉक्टरांनाच लक्ष्य केले. सुनील प्रभाकर घोंगडे (२९) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पाच लॅपटॉप व दहा डेस्कटॉप जप्त करण्यात आले.

सुनील हा नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील रहिवासी आहे. त्याने नांदेडच्या ग्रामीण पॉलिटेक्निक महाविद्यालयातून मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुणे येथे त्याला नोकरी लागली. काही महिने नोकरी केल्यानंतर त्याने औरंगाबादेत नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान पालकांनी त्याचे लग्न करून दिले. लग्नानंतरही त्याची लॉटरीची सवय सुटली नाही. पुढे तो कर्ज काढून लॉटरी खेळू लागला. ही बाब समजल्यानंतर पत्नीने त्याची साथ सोडून माहेर गाठले. "भविष्यासाठी १२ लाखांची तरतूद कर, मगच मी नांदायला येते,' अशी अट पत्नीने घातली. त्यामुळे पैसे जमवण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे त्याने सांगितले.
अपघातानंतर वळला चोरीकडे
पुण्यात असताना त्याला अपघात झाला होता. तेव्हा एका हॉस्पिटलमध्ये एमआयआर करण्यासाठी नेले असता डॉक्टरांच्या टेबलवरील महागडा डेस्कटॉप पाहून त्याचे डोळे फिरले. सर्वांची नजर चुकवत त्याने तो पळवला. डॉक्टरांच्या केबनिमधून वस्तू लंपास करणे सोपे वाटल्याने त्याला ही सवय लागली. या वस्तू विकून मिळालेल्या पैशातूनही त्याने लॉटरी खेळल्याचे पोलिसांनी सांगितले. जुलैच्या प्रारंभीपासून १६ ऑगस्टदरम्यान त्याने औरंगाबादमधील चोऱ्या केल्या आहेत.
पालकांचा पोटाला चिमटा
सुनीलचे वडील माजी सैनिक आहेत. सध्या ते भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यात सुरक्षा रक्षक आहेत. मुलगा शिकून मोठा होईल या आशेने त्यांनी पोटाला चिमटा घेऊन त्याला पॉलिटेक्निकचे शिक्षण दिले. तो आपल्या कष्टाचे चीज करेल, असे त्यांना वाटले होते.
कॅमेरा विकताना अडकला
चोरीचा कॅमेरा विकण्यासाठी तो निराला बाजारात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, गोेविंद पचरडे, भानुदास पवार, अशोक नागरगोजे, विकास कोमटवार, प्रदीप कुटे, रेवणनाथ गवळी, देवचंद मेहर यांनी त्याला पकडले. दरम्यान, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.