आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Last Six Months Above Hundred Robbery In Aurangabad

शहरात वाढल्या घरफोड्या; सहा महिन्यांत 103 तर 28 घरे दिवसा फोडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिसांची गस्त कमी झाल्यामुळे मागील सहा महिन्यांत 103 घरफोड्या झाल्या असून, यापैकी 28 घरे दिवसा फोडण्यात आली आहेत. पोलिस केवळ 14 घरफोड्यांतील तपास लावू शकले. पोलिसांवर इतर बंदोबस्ताचा ताण पडत असल्यामुळे गस्त कमी होत असल्याचे निवृत्त सहायक पोलिस उपअधीक्षक दिगंबर गाडेकर यांनी सांगितले.

मागील आठवड्यात उस्मानपुरा, गुरुगोविंदसिंगनगरातील बालाजी लोकमनवर यांच्या घरातून पंधरा तोळे सोने आणि अडीच हजार रुपयांची रोकड लांबवण्यात आली. ही चोरी दुपारी झाली. तर बुधवारी रात्री सिडको एन-2 भागातील जयभवानी पेट्रोल पंपाच्या मागील व्यंकटेश गॅस एजन्सीचे कार्यालय फोडून 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. गुरुवारी रात्री सेव्हन हिल्स कॉलनीत झालेल्या घरफोडीत 6 लाख रुपये आणि रिव्हॉल्व्हर लंपास केले.

बंगल्याला किंवा घराला कुलूप लावून बाहेर जाताना रोकड किंवा दागिने घरात ठेवणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. नागरिकांच्या घरांचा सांभाळ करण्यासाठी पोलिसांना रात्री आणि दिवसाची गस्त वाढवावी लागणार आहे. कर्मचार्‍यांची संख्या कमी असली तरी पोलिसांना अधिक गस्त घालण्याची आवश्यकता आहे. बीट मार्शलना अधिक गतिमान करणेही गरजेचे झाले आहे.


डाटा ठेवावा
रेकॉर्डवरील घरफोड्यांवर जास्त लक्ष ठेवले पाहिजे. त्यांचा सतत पाठपुरावा केल्यास घरफोड्या रोखण्यास मदत होते. नवीन घरफोड्यांचा डाटा अपग्रेड ठेवला पाहिजे. जेम्स अंबिलढगे, निवृत्त पोलिस निरीक्षक

अशा झाल्या घरफोड्या

12 जानेवारी
17 फेब्रुवारी
17 मार्च
13 एप्रिल
22 मे
17 जून
05 जुलै


बेरोजगारीमुळे गुन्हेगार वाढले
बेरोजगारी वाढल्यामुळे घरफोड्या वाढल्या. सराईत गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ होत आहे. पोलिस सक्रिय असले तर घरफोड्यांवर नियंत्रण मिळवता येते. रात्री आणि दिवसा फिरणार्‍या संशयितांवर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे. उत्तमराव लोखंडे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक

बंदोबस्तामुळे जबाबदारी वाढली
उन्हाळा आणि पावसाळ्यात घरफोड्यांचे प्रकार वाढतात. पोलिसांवर इतर बंदोबस्ताची जबाबदारी वाढल्याने रात्री गस्त होत नाही. त्यातच बाहेरगावचे घरफोडेही संधी साधून एकाच रात्रीत दोन-तीन घरफोड्या होतात. दिगंबर गाडेकर, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त

मेमध्ये सर्वाधिक घरफोड्या
मे महिन्यात रात्रीच्या सर्वाधिक 17 घरफोड्या झाल्या आहेत. जानेवारीत सर्वात कमी 12 घरफोड्या झाल्या असून, फेब्रुवारीत दिवसा 1 घरफोडी झाली. मार्चमध्ये दिवसा सर्वाधिक8 चोर्‍या झाल्या.

छायाचित्र :सेव्हन हिल कॉलनी येथे गुरुवारी घरफोडी झाली. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अधिकारी.