आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Action On Sand Smuggling, Divya Marathi

तहसीलदारांचा धसका, वाळू तस्कराचा पोबारा, वाहनांवर शुक्रवारी दंडात्मक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - गोदावरी वाळूपट्ट्यातून होणार्‍या चोरट्या वाळू वाहतुकीला चाप लावण्यासाठी तहसीलदारांनी शुक्रवारी (15 ऑगस्ट) अचानक पाचोड परिसरात भेट दिल्याने वाळू तस्करांनी एकमेकांना सूचना देत सतर्क केले.
दरम्यान, तहसीलदारांच्या भीतीने अनेक वाहनांनी आपला नियोजित मार्ग बदलला होता, तर काहींनी रस्त्याच्या आडमार्गावर वाळू टाकून देत पोबारा केल्याचे चित्र दिसून आले. तहसीलदार संजय पवार यांनी नऊ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. कारवाईच्या धास्तीने शुक्रवारी वाळू वाहतूक करणारे ट्रक पाचोड परिसरातून गायब झाले होते.
गोदावरीच्या टाकळी अंबड, हिरडपुरी, आवडे उंचेगाव (ता. पैठण) वाळूपट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू आहे, तर वाळू तस्कर दिवसभर प्रशासनाच्या वाहनांच्या मागावर राहत आपल्या गाड्यांना लोकेशन देत सतर्क ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. दररोज पाचोडमार्गे पाचशेच्या वर ट्रक क्षमतेपेक्षा अधिक वाळू घेऊन औरंगाबादच्या दिशेने धावताना दिसतात. बेलगाम वाळू वाहतुकीमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
तहसीलदार पवार यांनी शुक्रवारी पाचोड परिसरात भेट दिली असता त्यांना मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ मंडळाधिकारी गटकळ, हिवाळे, तलाठी बहुरे, सरोदे, अरुण बादाडे, भरत धारकर, पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान धडगे यांना मदतीला घेऊन वाहने पकडण्यास सुरुवात केली व नऊ वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या बाबीची इतरांना चाहूल लागताच त्यांनी रानावनात, आडवळणी रस्त्याने वाळूने भरलेले ट्रक पळवले. कुणी रस्त्यावरच वाळू रिकामी केली.
तहसीलदार कारवाई करत असल्याचे वाहनमालकाला समजताच तहसीलदारांच्या गाडीमागे पन्नास-शंभर फूट अंतराने वाळू तस्करांच्या वाहनांचा ताफा सारखा मागे-पुढे हिंडत होता. तहसीलदारांनी हूल देऊन इतर रस्त्याने वाहनाने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळपर्यंत वाळू तस्कर त्यांच्या पाळतीवर होते.